गॅस सिलिंडर स्फोटात तिघे गंभीर

By Admin | Updated: February 10, 2017 22:59 IST2017-02-10T22:59:03+5:302017-02-10T22:59:03+5:30

शासकीय विश्रामगृहाच्या पिछाडीस कारंडे मळा येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर टाकीमधून लहान सिलिंडर टाकीत बेकायदेशीर गॅस भरताना स्फोट होऊन

Gas cylinder blasts: Three | गॅस सिलिंडर स्फोटात तिघे गंभीर

गॅस सिलिंडर स्फोटात तिघे गंभीर

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 10 -  शासकीय विश्रामगृहाच्या पिछाडीस कारंडे मळा येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर टाकीमधून लहान सिलिंडर टाकीत बेकायदेशीर गॅस भरताना स्फोट होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले. यावेळी घरासह रिक्षाला आग लागून सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. 
जखमींमध्ये शशिकांत तोलाराम आहुजा (वय ५०), त्यांचा मुलगा सनी (२६), कामगार दत्तात्रय बापू गुरव (२२, रा. बहिरेश्वर, ता. करवीर) यांचा समावेश असून त्यांना न्यू शाहूपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. गुरव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन-अडीच किलोच्या सत्तर गॅस सिलिंडरच्या टाक्या जप्त केल्या तसेच संशयित आरोपी शशिकांत आहुजा याला रात्री उशिरा अटक केली. 
अधिक माहिती अशी, शशिकांत आहुजा यांचे शिवाजी चौकात गॅस शेगडीचे दुकान आहे.  शासकीय विश्रामगृहाच्या पिछाडीस कारंडे मळा येथे घर आहे. घरासमोरील रिकाम्या जागेतील गोडाऊनमध्ये ते त्यांचा मुलगा व कामगार असे तिघेजण घरगुती वापराच्या दोन सिलिंडरमधील गॅस दोन ते अडीच किलोच्या लहान सिलिंडर टाकीत भरत होते. काही सिलिंडर टाक्यांमध्ये गॅस भरून त्या रिक्षामध्ये ठेवल्या होत्या. त्यांच्या शेजारीच ते गॅस भरत होते. यावेळी अचानक लहान सिलिंडर टाकीचा स्फोट होऊन आग लागली. त्यामध्ये भाजून तिघेही गंभीर जखमी झाले. स्फोटाचा आवाज ऐकून आहुजांच्या घरातील सर्वजण बाहेर पळत आले. गॅस आजूबाजूला पसरून घराला व रिक्षाला आग लागली. यावेळी आहुजा कुटुंबीयांनी घरातील पाण्याचा मारा करून आग विझवली. त्यानंतर तिघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. आजूबाजूला भर नागरी वस्ती आहे. आग तत्काळ विझवली नसती तर मोठी हानी झाली असती. 

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न 
शशिकांत आहुजा यांच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर गॅस भरून विक्री केल्याप्रकरणी जुना राजवाडा व शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. घरासमोरील गोडावूनमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचू नये, यासाठी त्यांनी आगीची वर्दी अग्निशामक दलास दिली नाही. कोणताही गाजावाजा न करता घरातील पाण्याने आग विझवली. त्यानंतर तिघेही दुपारी दोनच्या सुमारास सीपीआरमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने शाहूपुरी पोलिसांना फोनवरून वर्दी कळविली. त्यामध्ये पितळी गणपतीजवळ गॅस शेगडी दुरूस्त करताना स्फोट होऊन तिघेजण जखमी झाले होऊन उपचारासाठी दाखल झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोन बीटमार्शल रुग्णालयात जबाब घेण्यासाठी गेले. याठिकाणी जखमींनी रुग्णालय प्रशासनासह पोलिसांपासून घटना लपविण्याचा प्रयत्न केला. 

खबऱ्याने दिली टीप 
शाहूपुरी हद्दीतील खबऱ्याने पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांना फोन करून आहुजा यांनी पोलिसांना दिलेली माहिती खोटी असून त्यांच्या घरी गॅसचा स्फोट झाल्याचे सांगितले. त्यावर चौगुले यांनी गुन्हे शाखेच्या सहकाऱ्यांना घेऊन आहुजा यांचे घर गाठले. पाहतात तर घरासह रिक्षा पेटली होती. खिडक्यांचे लोखंडी गज वितळून गेले होते. घराच्या बाजूलाच ट्रक व कार लावली होती. या दोन्ही वाहनांची पाहणी केली असता सुमारे दोन मोठे व सत्तर लहान टाकीचे सिलिंडर मिळाले. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शशिकांत आहुजा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांचे दुर्लक्ष 
शासकीय विश्रामगृहाच्या मागे बिनदिक्कत बेकायदेशीर गॅस भरून त्याची विक्री होत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना नव्हती का? आहुजा हा पोलिस रेकॉर्डवर आहे. त्याच्या हालचालींवर पोलिसांची नजर होती की जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात होते, अशी चर्चा नागरिकांतून आहे. 

Web Title: Gas cylinder blasts: Three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.