गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी कोकणवासियांनी तयारी सुरु केली आहे. तिकीट मिळाले तरी आणि नाही मिळाले तरीही लोकांनी कामाच्या ठिकाणी सुट्ट्या टाकलेल्या आहेत. ट्रेनची तिकीटे तर तीन महिन्यांपूर्वीच फुल झालेली आहेत. अशात अनेकजण स्पेशल ट्रेन आणि तात्काळची वाट पाहत आहेत. ही संधी हुकली तरी देखील चाकरमानी सालाबादप्रमाणे मिळेल त्या डब्यात घुसून गावी जाणार आहेत. याच चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांनी यंदा मोफत ट्रेन उपलब्ध केल्या आहेत.
नितेश राणे गेल्या काही वर्षांपासून मोफत बस सेवा उपलब्ध करत असतात. यंदा राणे यांनी ट्रेन उपलब्ध केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या ट्रेन मोफत आहेत परंतू त्यांचे तिकीट घ्यावे लागणार आहे. या मोफत ट्रेनची माहिती राणे यांनी माध्यमांना दिली आहे.
यंदा कोकणात जाण्यासाठी दोन मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. २३ व २४ ऑगस्ट २०२५ या दोन दिवशी या ट्रेन सुटणार आहेत. सकाळी ११ वाजता दादर स्टेशनवरून या ट्रेन कोकणात जाण्यासाठी निघणार आहेत. याचे तिकीट वाटप १८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.