गांजानं 1500 वर्षे केलं वेरूळच्या लेण्यांचं संरक्षण
By Admin | Updated: March 10, 2016 12:59 IST2016-03-10T12:49:01+5:302016-03-10T12:59:41+5:30
वेरूळच्या लेणी व गुहांमधली कला 1500 वर्षे सुस्थितीत राहण्यामागे गांजा असल्याचे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना आढळले आहे

गांजानं 1500 वर्षे केलं वेरूळच्या लेण्यांचं संरक्षण
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 10 - वेरूळच्या लेणी व गुहांमधली कला 1500 वर्षे सुस्थितीत राहण्यामागे गांजा असल्याचे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना आढळले आहे. माती व चुनकळीबरोबरच गांजाचा वापर या लेण्यांच्या लेपासाठी करण्यात आल्याचे पुरातत्व खात्याच्या अभ्यासात दिसून आलं आहे, ज्यामुळे लेणी व चित्रे शाबूत राहिली आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रसायन शास्त्रज्ञ राजदेव सिंग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बॉटनीचे प्राध्यापक एम. एम. सरदेसाई यांनी या विषयावर संशोधन केले आहे. मार्चच्या विज्ञान अहवालात या विषयावर माहिती देण्यात आली आहे.
माती व चुनकळीबरोबर गांजा किंवा भांग यांचा समावेश लेपामध्ये करण्यात आल्याचे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फोरियर ट्रान्सफॉर्म, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी व स्टिरीओ मायक्रोस्कोप या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर सिद्ध झाले आहे.
जालना व दिल्ली येथील गांजाच्या नमुन्यांची वेरूळमध्ये आढळलेल्या पदार्थांशी तुलना करण्यात आली आणि यावर शिक्कामोर्तब झाले. वेरूळमधल्या लेपांसाठी वापरलेल्या नमुन्यामध्ये गांजाचे प्रमाण 10 टक्के आढळले आहे. यामुळे वेरूळच्या लेण्यांचे दीड हजार वर्षे जीवजंतूंपासून रक्षण झाले असावे असा अंदाज आहे.