गँगस्टर रवी पुजारीचे कंबरडे पुन्हा मोडले
By Admin | Updated: November 19, 2014 05:04 IST2014-11-19T05:04:54+5:302014-11-19T05:04:54+5:30
दिग्दर्शक महेश भट यांची हत्या घडवून बॉलीवूडसह मुंबईतील हॉटेल व्यावसायिक, बिल्डरांमध्ये दहशत निर्माण करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या गँगस्टर रवी पुजारीचे मुंबई गुन्हे शाखेने कंबरडे मोडले आहे

गँगस्टर रवी पुजारीचे कंबरडे पुन्हा मोडले
जयेश शिरसाट, मुंबई
दिग्दर्शक महेश भट यांची हत्या घडवून बॉलीवूडसह मुंबईतील हॉटेल व्यावसायिक, बिल्डरांमध्ये दहशत निर्माण करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या गँगस्टर रवी पुजारीचे मुंबई गुन्हे शाखेने कंबरडे मोडले आहे. भट यांच्या हत्येची तयारी करणाऱ्या १३ जणांना गुन्हे शाखेने गजाआड केले. प्रत्यक्षात हे सर्वच स्वतंत्र मोडयूलप्रमाणे पुजारीसाठी काम करत होते. एकाच कारवाईत गुन्हे शाखेने चार मॉड्यूल पकडल्याने पुजारी बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे.
मुंबई, युपी, बिहारमधून बेरोजगार तरुणांना हाताशी धरून व्यावसायिकांची कार्यालये, निवासस्थानाबाहेर हवेत गोळीबार घडवून आणायचे. शूटरकरवी तेथे स्वत:चा फोननंबर लिहिलेली चिठ्ठी सोडायची. फोन आलाच तर यावेळी हवेत गोळया झाडल्यात, पुढल्यावेळी तुझ्यावर किंवा कुटुंबियांवर झाडेन, अशी धमकी देऊन खंडणी उकळायची, ही पुजारीची मोडस आॅपरेंडी. तीनेक वर्षांपूर्वी शहरात ठिकठिकाणी अशाच पद्धतीने गोळीबार करवून पुजारीने दहशत निर्माण केली होती. त्याच्या बंदोबस्ताठी पश्चिम प्रादेशिक विभागातील हुशार, चपळ आणि अनुभवी अधिकाऱ्यांचे विशेष पथक निर्माण करण्यात आले. या पथकाने तब्बल १३ ते १५ पुजारी टोळीचे गँगस्टर गजाआड करून सर्व गुन्ह्यांची उकल केली होती.
त्यानंतर पुजारीने फंडा बदलला. कामात सहभागी झालेल्या किंवा अटक झालेल्या गँगस्टरशी तो संबंध तोडू लागला. परिस्थितीने खचलेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना तो हाताशी धरू लागला. मात्र यावेळी त्याने हवेत गोळीबार करण्याऐवजी व्यावसायिकांच्या कार्यालयात जो कोणी दिसेल त्याच्यावर गोळया झाडण्यास सुरुवात केली. यात मात्र व्यावसायिकांचे कामगार, कर्मचाऱ्यांचे विनाकारण प्राण जाऊ लागले.
यावर्षी आॅगस्टपासून पुजारी पुन्हा सक्रिय झाला. आॅगस्ट महिन्यात त्याने दिग्दर्शक करीम मोरानी यांच्या घरावर गोळीबार घडवून आणला. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीदाराची हत्या घडविण्यासाठी शूटर धाडले. ते गुन्हे शाखेने गजाआड करून जे डे हत्याकांडाची पुनरावृत्ती टाळली. तर मोरानी गोळीबाराला फार प्रसिद्धी न देता पुजारीचे मानसिकरित्या खच्चीकरण केले. यामुळे अस्वस्थ झालेल्या पुजारीने विश्वासू साथीदार इशरत बादशहा शेख उर्फ राजा आणि महोम्मद अझीझ अब्दुल रशीद मर्चंट यांच्या माध्यमातून सुमारे चार मॉड्यूल तयार केली. यापैकी एका मॉड्यूलने मोरानी यांच्या घरावर गोळीबार केला होता. त्या व अन्य तीन मॉड्यूलनी भट यांच्या हत्येची तयारी सुरू केली होती. या सर्वांच्या चौकशीतून पुजारीच्या मॉड्यूलची धक्कादायक माहिती समोर आली.