सामूहिक बलात्कार, हत्येप्रकरणी दोघांना फाशी

By Admin | Updated: May 12, 2017 03:44 IST2017-05-12T03:44:37+5:302017-05-12T03:44:37+5:30

कचरावेचक दोन तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून एकीची हत्या करणाऱ्या दोघा नराधमांना ठाणे

Gangrape, murder of both of them on murder charges | सामूहिक बलात्कार, हत्येप्रकरणी दोघांना फाशी

सामूहिक बलात्कार, हत्येप्रकरणी दोघांना फाशी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कचरावेचक दोन तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून एकीची हत्या करणाऱ्या दोघा नराधमांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा ठोठावली. रहिमुद्दीन महफू ज शेख उर्फ बाबू उर्फ बाबा (२४) आणि संदीप समाधान शिरसाठ उर्फ रघू रोकडा (२०) अशी फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
या प्रकरणाची सुनावणी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.सी. खलिपे यांच्यासमोर झाली. रक्ताचे डाग असलेले कपडे, हत्येसाठी वापरलेली हत्यारे, फिर्यादी आणि ११ साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून या दोघांना दोषी ठरवण्यात आले. दोघांनाही ३०२ कलमान्वये फाशीची शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, ३७६ कलमान्वये जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड तसेच ३२६ कलमान्वये १० वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडातील १५ हजार रुपये मृत तरुणीच्या वारसांना, तर उर्वरित १५ हजार रुपये पीडित फिर्यादीला देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
२०१२ मध्ये नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. ९ मे २०१२ रोजी घाटकोपर येथील विद्या बनसोडे (२८) ही नवी मुंबई येथे राहणाऱ्या मैत्रिणीकडे आली होती. दोघीही कचरावेचक असल्याने त्या दिवशी दोघी वाशी रेल्वे स्टेशनजवळ बसथांब्यावर ये-जा करणाऱ्या लोकांकडे पैसे मागत असताना, दोघींना आरोपींनी नोकरी देतो, असे सांगून रिक्षात बसवून मुंबई-पुणे हायवेने जुईनगर ब्रिजजवळ नेले. तेथे रिक्षा सोडून सीबीडी येथील बोगद्यात त्यांना ते घेऊन गेले. तेथे दोघांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच त्यांनी त्या दोघींवर तीक्ष्ण हत्याराने वार केले.
याचदरम्यान, विद्याची मैत्रीण तेथून पळून जात असताना काही अंतरावर जाऊन बेशुद्ध होऊन पडली, तर विद्याचा जागीच मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू झाल्याचे समजून हे दोघे आरोपी पळून गेले.
विद्या हिच्या शरीरावर ८ ते १० आणि तिच्या मैत्रिणीवर ११ ते १२ वार करण्यात आले होते. याचदरम्यान, तेथून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने विद्याच्या मैत्रिणीला रुग्णालयात नेले. ती शुद्धीवर आल्यानंतर १० मे रोजी या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पीडित आणि आरोपी अशा चौघांना तेथील एका सुरक्षारक्षकाने एकत्र पाहिले असल्याचे पोलिसांना सांगितले होेते.
तसेच त्यातील बाबू नावाच्या व्यक्तीला ओळखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार, १४ मे २०१२ रोजी नवी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून रक्ताचे डाग असलेले कपडे, हत्यारे जप्त केली.

Web Title: Gangrape, murder of both of them on murder charges