गंगाखेड शुगरच्या अध्यक्ष, संचालक मंडळावर गुन्हा
By Admin | Updated: July 7, 2017 05:02 IST2017-07-07T05:02:20+5:302017-07-07T05:02:20+5:30
८ ते १० हजार शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी

गंगाखेड शुगरच्या अध्यक्ष, संचालक मंडळावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (जि. परभणी) : ८ ते १० हजार शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी गंगाखेड शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी आणि सहा बँकांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ४ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते.
गंगाखेड तालुक्यातील विजयनगर माखणी येथील गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी प्रा़ लि़ या साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याचे सभासद असणाऱ्या ८ ते १० हजार शेतकऱ्यांच्या
ाावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केली, अशी फिर्याद गिरीधर शिवाजी सोळंके (रा. नागापूर, ता. परळी) या शेतकऱ्याने गंगाखेड पोलीस
ठाण्यात बुधवारी रात्री ११.५५ वाजता दिली.
या फिर्यादीवरून कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ, आर्थिक व्यवहार सांभाळणारे तसेच पीक कर्जाची कामे हाताळणारे शेतकी अधिकारी, कर्मचारी, बनावट शिक्के व कागदपत्रे तयार करणारे कर्मचारी, खाजगी व्यक्ती आणि आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक, बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, रत्नाकर बँकेचे अधिकारी यांच्याविरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री ११़५५ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे़ या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे करीत आहेत़
परभणीचे पथक औरंगाबादेत
गुट्टे यांच्यावर गंगाखेड
पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ११.५५ वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक हिबारे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक औरंगाबादला रवाना झाले. मध्यरात्रीच हे पथक औरंगाबाद येथील सातारा परिसरातील त्यांच्या घरी पोहचले व तेथे गुट्टे यांना नोटीस बजावली. शुक्रवारी परभणीतील एलसीबीच्या कार्यालयात हजर राहाण्यास सांगितले आहे.
सहा बँकांकडून मिळवले कर्ज
शेतकरी गिरीधर सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीत आंध्रा बँक (३९.१७ कोटी), युको बँक (४७.७८ कोटी), युनायटेड बँक (७६.३२ कोटी), बँक आॅफ इंडिया (७७.५९ कोटी), सिंडिकेट बँक (४७.२७ कोटी) व रत्नाकर बँक (४०.२० कोटी) या बँकांच्या अधिकाऱ्यांनी ज्यांचे बँकेमध्ये खाते नाही अशा शेतकऱ्यांच्या नावाने खाते उघडून त्यांच्या नावाने कर्ज घेऊन ती संपूर्ण रक्कम गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी या कारखान्याच्या करंट अकाऊंटमध्ये स्वत:च्या फायद्यासाठी वळती केल्याचे म्हटले आहे.
मृतांच्या नावावरही कर्ज
सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीत काही मृत व्यक्तींच्या नावावरही कर्ज घेतले असल्याचे नमूद केले आहे. त्यामध्ये चार मृतांची नावे देण्यात आली असून त्यांच्या नावावर एकूण ८ लाख २९ हजार ८५० रुपयांचे कर्ज उचलण्यात आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हजर राहणार - गुट्टे
परभणी पोलिसांनी बुधवारी रात्री नोटीस बजावली आहे. त्यांच्या नोटीसप्रमाणे चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहणार आहे. कोणाच्याही नावे कर्ज उचलले नाही. आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा हा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याची प्रतिक्रिया रत्नाकर गुट्टे यांनी दिली.