चोरट्या महिलांची टोळी जेरबंद
By Admin | Updated: August 3, 2016 01:54 IST2016-08-03T01:54:18+5:302016-08-03T01:54:18+5:30
खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत जाऊन दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

चोरट्या महिलांची टोळी जेरबंद
पिंपरी : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत जाऊन दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीतील महिलांना सोलापूर आणि हडपसरमधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, एक मोटार असा पाच लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरोपींना पकडणे पोलिसांना शक्य झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव शांताराम पवार (वय ३६), चंदा अप्पा जाधव (वय ३८), सविता निवृत्ती जाधव (वय ३७, सर्व रा. करमाळा, सोलापूर), कल्पना अंकुश कांबळे (वय ३२, रा. गोसावीवस्ती, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी रवींद्र देवकर (वय ३२, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
२७ जुलैला आरोपी महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने देवकर यांच्या कस्पटेवस्ती येथील सराफी पेढीत गेल्या . दुकानदार देवकर
यांची नजर चुकवून दोन आरोपी महिलांनी पेढीतील दोन लाख
६६ हजार रुपये किमतीचे १३
तोळे दागिने असलेला ट्रे लंपास
केला. हा प्रकार सराफी पेढीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
या गुन्ह्याच्या वाकड पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचचे अधिकारीही तपास करत होते.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे आणि पोलीस नाईक भरत रणसिंग यांना आरोपी सदाशिव याने त्याच्या साथीदार महिलांसह वाकड येथील देवकर यांच्या सराफी पेढीत चोरी
केली असून, ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात गेले असल्याचे
माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना पोलिसांनी जेरबंद
केले.
फुगेवाडीत वृद्धाला मारहाण
जागेच्या वादातून एका वृद्धाला फुगेवाडी येथे मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रवींद्रसिंग कोहली (वय ६३, रा. फुगेवाडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
कोहली यांचे दापोडीमध्ये एक दुकान आहे. या दुकानाचा करार त्यांनी रद्द केला असल्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाला असल्याचा
अंदाज वर्तविण्यात येत आहे. या हल्ल्यात त्यांचा मुलगा एकमसिंग कोहली जखमी झाला आहे.