गांधी विचारांची हत्या होऊच शकत नाही

By Admin | Updated: September 2, 2015 23:50 IST2015-09-02T23:50:05+5:302015-09-02T23:50:13+5:30

गांधी स्मारक समितीचे सचिव राजन अन्वर यांच्याशी संवाद.

Gandhi can not be killed | गांधी विचारांची हत्या होऊच शकत नाही

गांधी विचारांची हत्या होऊच शकत नाही

बुलडाणा :महात्मा गांधी हे केवळ एका व्यक्तीचे नाव नव्हे, तर विचाराचे नाव आहे. त्यांचा विचार सर्वकालीन आहे. त्यांची हत्या झाली, मात्र त्यांच्या विचारांची हत्या करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ते शक्य नाही. गांधी विचारांमध्ये प्रत्येक समस्येवर उपाय आहे. आजच्या राज्यकर्त्यांची वैचारिक धारणा काहीही असली, तरी त्यांना शांतता व विकासासाठी गांधी विचारांचाच आधार घ्यावा लागतो, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही, असा विश्‍वास प्रख्यात गांधीवादी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव राजन अन्वर यांनी व्यक्त केला. ते बुधवारी बुलडाण्यात आले असता, त्यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला.

प्रश्न : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे काम कसे चालते ?
महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार, प्रसार व्हावा आणि तशी कृती व्हावी, यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ गांधीवादी बाळासाहेब भारदे या संस्थेचे अध्यक्ष होते. या संस्थेमार्फत गांधी अध्ययन केंद्र व गांधी विचार केंद्र अशा दोन केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात गांधी विचारांचा प्रसार करण्याचे काम गावोगावी केले जात आहे.

प्रश्न : या केंद्रांमधून कोणते उपक्रम राबविले जातात ?
गांधी अध्ययन केंद्राच्या माध्यमातून गांधी विचारांची वाचनालये, चर्चासत्र, शिबिरे घेतली जातात, तर ग्रामविकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये संपूर्ण स्वच्छता, शौचालय निर्मिती आणि वापर, यासोबतच ग्रामीण युवकांसाठी व्यक्तीमत्व विकास शिबिरे व प्रबोधन शिबीरे घेतली जातात. राज्यस्तरावरही अशा शिबिरांचे आयोजन केले जाते. विशेषत: गांधी सप्ताहात समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून होतो.

प्रश्न : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीकडे किती जमीन आहे ?
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी तत्कालिन सीपी अँन्ड बेरारकडून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यात सरकारी जमिनी मिळाल्या. या जमिनींवर ग्रामविकास समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे काम चालते. अनेक जिल्ह्यात या जमिनींचा ताबा खाजगी व्यक्तींनी अनधिकृतरित्या घेतला आहे. त्याचा शोध समितीने सुरू केला आहे. या जमिनी पुन्हा ताब्यात घेवून गांधी विचारांचा प्रसार केला जाईल.

प्रश्न : तरूणांपर्यंत गांधी विचार पोहोचत नाहीत, याची काय कारणे असावीत ?
आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कमी पडलो, हे खरे आहे. आताची माध्यमे बदलली. या माध्यमांचा वापर करण्यासाठी गांधी स्मारक निधीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. सोशल मिडीया, विविध सिडी तसेच लघुकथांच्या माध्यमातून तरूणांना खरे गांधी विचार कळले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.

प्रश्न : आताच्या काळात गांधी विचार कितपत संयुक्तीक वाटतात ?
केवळ आताच्याच नव्हे तर भूतकाळ आणि भविष्यातही गांधी विचारांना मरण नाही. देशात सध्या एका वेगळ्या विचारांचे स्तोम माजविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे; मात्र तशी वैचारिक पातळी असलेल्या लोकांनाही शांततेसाठी आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी गांधीच लागतो. जगभरातील अनेक नेते नेल्सन मंडेला, बराक ओबामा किंवा अलिकडच्या काळात मलाला यांनीसुध्दा गांधी विचारांनाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ह्यगांधीह्ण कधीही मरणार नाही.

प्रश्न : सोशल मिडीयावर गांधी विचारांचा अनेकदा विपर्यास दिसतो ?
हो, हे खरे आहे. वैचारिक स्वातंत्र्य ही संकल्पना आपण मान्य केल्यामुळे प्रत्येकजण आपल्या मतांचे प्रदर्शन करतो. सोशल मिडीयावर गांधीव्देष हेच गृहीत मानून जे विपर्यास करतात त्यांनी खरा गांधी वाचलाच नाही. विचारांची लढाई ही विचारांनीच केली जाते. त्यामुळे कितीही अपप्रचार झाला तरी अशा विपर्यासाचे आयुष्य अल्पजीवी आहे.

Web Title: Gandhi can not be killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.