‘ट्रॅव्हल्स’चा प्रवाशांच्या जिवाशी खेळ

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30

स्टेज परमिट नसतानाही खासगी ट्रॅव्हल्समधून सर्रास अवैध प्रवासी वाहतूक होत आहे.

Games with travelers' travels | ‘ट्रॅव्हल्स’चा प्रवाशांच्या जिवाशी खेळ

‘ट्रॅव्हल्स’चा प्रवाशांच्या जिवाशी खेळ

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- स्टेज परमिट नसतानाही खासगी ट्रॅव्हल्समधून सर्रास अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. मुंबईतून अनेक जिल्ह्यांमध्ये या खासगी ट्रॅव्हल्सचे जाळे जोडले गेले आहे. कमाईच्या उद्देशाने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये कोंबले जात आहेत. त्यांच्याकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ होत असतानाही आरटीओचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे.
मुंबई - पुणे या दोन शहरांचे अंतर कमी करण्यासाठी बनवलेला द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. वाहनचालकांकडून वेगमर्यादा तोडून लेनची शिस्तही पाळली जात नसल्यामुळे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.
रविवारी घडलेल्या अपघातात निखील ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमध्ये चालकासह ५० प्रवाशांची क्षमता असतानाही ६१ प्रवासी कोंबलेले होते. आसन व्यवस्थेनुसार जादा १० प्रवासी हे चालकाच्या केबिनमध्ये अथवा मोकळ्या जागेत बसवल्याची शक्यता आहे. त्यामुळे या अपघाताला ट्रॅव्हल्स मालकालाही तितकेच जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे.
ही परिस्थिती बहुतांश खासगी ट्रॅव्हल्समध्ये पहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुंबईशी जोडणाऱ्या शेकडो ट्रॅव्हल्स सद्य:स्थितीला चालवल्या जात आहेत. त्यापैकी बहुतेक ट्रॅव्हल्स मालकांचे हात थेट मंत्रालयापर्यंत पोचलेले आहेत. खासगी ट्रॅव्हल्समुळे राज्य परिवहन मंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
खासगी ट्रॅव्हल्सला केवळ समूहाचे बुकिंग असलेल्या प्रवाशांच्या पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहतुकीला परवानगी आहे. त्याव्यतिरिक्त तिकीट घेवून वैयक्तिक प्रवासी भरण्यास व जागोजागी थांबण्याची त्यांना परवानगी नाही.
शासनाने हे अधिकार केवळ एसटीला दिले आहेत. त्यानंतरही मुंबई, नवी मुंबईसह राज्यभरात हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अवघ्या नवी मुंबईतच वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी, कळंबोली व पनवेल हे ट्रॅव्हल्सचे अवैध थांबे बनले आहेत. यानंतरही आरटीओने ठोस कारवाई केल्याचे अद्याप पहायला मिळालेले नाही.
> मालकावर गुन्हा दाखल होणार
रविवारी पहाटे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातावेळी निखील ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यानुसार नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्सच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.
प्रवाशांना ट्रॅव्हल्सची भुरळ
एसटीपेक्षा कमी किमतीमध्ये शिवाय चित्रपट पाहत प्रवासाचे आमिष दाखवून खासगी ट्रॅव्हल्सकडे प्रवासी ओढले जातात. त्याकरिता आसन क्षमता संपल्यानंतरही जादा प्रवासी घेवून त्यांना चालकाच्या केबिनमध्ये बसवले जाते. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. यावरून दाखल झालेल्या याचिकेनुसार न्यायालयाने शासनासह संबंधित विभागांवर यापूर्वी ताशेरे देखील ओढलेले आहेत. त्यानंतरही परिस्थिती जशीच्या तशी असल्याचे पहायला मिळत आहे.

Web Title: Games with travelers' travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.