‘एमटीडीसी’चा खेळखंडोबा

By Admin | Updated: January 30, 2015 00:16 IST2015-01-30T00:10:43+5:302015-01-30T00:16:44+5:30

पर्यटन विकासाला खीळ : भाडे आणि दुरुस्तीमध्ये अडकले पर्यटन महामंडळ

The game section of 'MTDC' | ‘एमटीडीसी’चा खेळखंडोबा

‘एमटीडीसी’चा खेळखंडोबा

संदीप खवळे - कोल्हापूर पर्यटनाच्या माध्यमातून महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न मिळविण्याची संधी असतानाही पर्यटन विकास महामंडळाने कोल्हापूरकडे केलेले दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे. केवळ एक सहायक कर्मचारी आणि शाखा अभियंता यांच्यावर कोल्हापूर येथील कार्यालयाचा भार आहे.  बुकिंग सोडले तर पर्यटन व्यवसायाला चालना देणारे कोणतेही काम या कार्यालयामधून होत नाही. पन्हाळा फोर्ट या पर्यटन निवासाला भाडेच न दिल्यामुळे पर्यटन विकास महामंडळाने निवास सील केल्याचे समजते; तर दाजीपूर आणि गगनबावडा येथील पर्यटन निवास केंद्रे अद्यापही दुरुस्त व्हायची आहेत.  १९७५ ला महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयाकडे पन्हाळा येथे पन्हाळा फोर्ट आणि महालक्ष्मी पर्यटन निवास अशा दोन मालमत्ता भाग भांडवलापोटी देण्यात आलेल्या होत्या. यांपैकी पन्हाळा फोर्ट आणि महालक्ष्मी पर्यटन निवास भाडेकराराने देण्यात आले होते. यातील पन्हाळा फोर्टचे भाडे न दिल्यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी या पर्यटन निवासाला महामंडळाने कुलूप लावल्याचे समजते. महालक्ष्मी रिसॉर्टही भाडेकराराने दिलेले आहे. दाजीपूर आणि गगनबावडा येथील पर्यटन निवास केंद्रांची दुरुस्तीच सुरू आहे. आजघडीला एम.टी.डी.सी.च्या कोल्हापूर कार्यालयाकडून एकही पर्यटन केंद्र चालविले जात नाही. परिणामी, उत्पन्नावर प्रचंड परिणाम होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कोल्हापूर येथील विभागीय कार्यालय बंद करून ते प्रथम रत्नागिरी व त्यानंतर सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पुणे कार्यालयास जोडले. त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनाला खीळ बसली आहे. पन्हाळा फोर्टच्या नूतनीकरणासाठी सन २००९-१० मध्ये  १ कोटी ८५ लाख रुपये मंजूर केले आहेत; पण पन्हाळा फोर्टच्या मालमत्तेवर ‘सरकारी मालकीची जमीन’ असा शेरा असल्यामुळे पन्हाळा नगरपरिषदेने बांधकाम परवाना नाकारला आहे. त्यामुळे नूतनीकरणास ‘खो’ बसून गेली पाच वर्षे हा निधी तसाच पडून आहे.

कोल्हापूर येथे महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय पूर्वीप्रमाणे सुरू झाले पाहिजे. कार्यालय असल्याशिवाय इथल्या पर्यटन विकासाला चालना मिळणार नाही. पर्यटन विकासाशी संबंधित बाबींचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले नाहीत. केंद्राकडे पर्यटन विकासासाठी भरीव निधी आहे.
- आनंद माने, अध्यक्ष, कोल्हापूर
चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

Web Title: The game section of 'MTDC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.