मुंबईचे खच्चीकरण करण्याचा डाव -नारायण राणे
By Admin | Updated: September 25, 2014 09:22 IST2014-09-25T09:22:50+5:302014-09-25T09:22:50+5:30
रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री नारायण राणेंनी केला आहे.

मुंबईचे खच्चीकरण करण्याचा डाव -नारायण राणे
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी आज पत्रपरिषदेत केला.
या निर्णयामुळे मुंबईतील व्यवसाय स्थलांतरित होतील, अशी भीती व्यक्त करून राणे म्हणाले की, हे विभाग मुंबईत परत आणले नाहीत तर काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. मुंबई पोर्ट ट्रस्टची ७५ हजार कोटी रुपये किमतीची जागा एका बड्या उद्योगपतीला केमिकल पार्कच्या रुपाने देण्याचे आणि पोर्ट ट्रस्टच्या गतिविधी गुजरातमधील पोर्ट ट्रस्टकडे वळविण्याचे घाटत आहे. (विशेष प्रतिनिधी)
मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव
मुंबईचे महत्त्व कमी करतानाच ती केंद्रशासित करण्याचा केंद्राचा डाव आहे. चीनच्या पंतप्रधानांना देशाची आर्थिक राजधानीत मुंबईत न आणता गुजरातमध्ये नेण्यात आले. गुजरातमधील स्टॅच्यू आॅफ युनिटीला २०० कोटी रुपये केंद्राने दिले पण छत्रपती शिवरायांच्या मुंबईतील स्मारकासाठी एक छदामही दिला नाही, असा आरोप राणे यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असे होऊ दिले नसते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
-----
रिझर्व्ह बँकेने १५ जुलै २०१४ रोजी परकीय गुंतवणूक विभाग व या अंतर्गत असलेले लायझनिंग, अनिवासी भारतीयांचा परदेशी बँकिंग विभाग व अचल मालमत्ता विभाग हे तिन्ही विभाग मुंबईत असलेल्या बँकेच्या मुख्यालयातून दिल्लीतील विभागीय कार्यालयात हलविले आहेत. दिल्लीत पार्लमेंट स्ट्रीटवरील रिझर्व्ह बँकेच्या इमारतीत हा विभाग हलविण्यात आला असून, या सर्व विभागाचे कामकाज हाताळण्यासाठी पी. श्रीराम यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक केली आहे.
------
रिझर्व्ह बँकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक विभागांमध्ये 'व्हर्टिकल हेड्स' नेमण्याची प्रक्रिया सुरू असून, नोटा छापण्यापासून अनेक महत्वाच्या कामांचे आऊटसोर्सिंग होत आहे. परदेशी व्यवहारासारखा विभाग दिल्लीत हलविण्यामागचा तर्क स्पष्ट व्हायला हवा.
- विश्वास उटगी, सरचिटणीस, आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन.