नालासोपाऱ्यात गॅलरी कोसळली
By Admin | Updated: June 30, 2016 03:27 IST2016-06-30T03:27:40+5:302016-06-30T03:27:40+5:30
दुमजली इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच रात्री पूर्वेकडील अति धोकादाक असलेल्या आत्मवल्लभ सोसायटीतील एका इमारतीची गॅलरी कोसळली.

नालासोपाऱ्यात गॅलरी कोसळली
विरार : नालासोपारा शहरात पहाटे एक दुमजली इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच रात्री पूर्वेकडील अति धोकादाक असलेल्या आत्मवल्लभ सोसायटीतील एका इमारतीची गॅलरी कोसळली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच इमारतीचा काही भाग कोसळला होता. या इमारतीत चार कुटुंबे रहात होती. त्यांना ताबडतोब बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली.
नालासोपारा पूर्वेकडे आचोळे रोडवर २३ इमारतींची आत्मवल्लभ सोसायटी वसली आहे. ३५ वर्षांपूर्वी आत्मवल्लभ जैन उत्कर्ष संस्थेने समाजातील गरीब वर्गासाठी या इमारती बांधून रहावयास दिल्या होत्या. सध्या इमारती मोडकळीस आल्या असून अतिधोकादाक स्थितीत पोचल्या आहेत. यातील १६ क्रमांकाच्या इमारतीची पहिल्या मजल्यावरील गॅलरी काल रात्री दहाच्या सुमारास कोसळली. गेल्या वर्षी याच इमारतीचा काही भाग कोसळला होता. तरीही अतिधोकादाक असलेल्या या इमारतीत चार कुटुंबे रहात होती. सकाळी पालिकेच्या पथकाने सर्व कुटुंबांना घराबाहेर काढून इमारत रिकामी केली. आता इमारत तोडण्याची नोटीस ट्रस्टला देण्यात आली आहे. दरम्यान, नालासोपारा स्टेशननजिक असलेल्या आत्मवल्लभ सोसायटीतील दोन इमारती पाडण्यात आल्या असून सध्या २१ इमारतीही अति धोकादाक अवस्थेत असून त्यामध्ये सुमारे ९० कुटुंबे रहात आहेत. ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या सोसाटीत ५०२ घरे आणि १०६ दुकाने आहेत. सर्वच इमारती अति धोकादायक असल्याने पालिकेकडून गेल्या १२ वर्षांपासून दरवर्षी इमारत रिकाम्या करण्याच्या नोटीसा ट्रस्टला बजावण्यात येत आहेत. सध्या ५०२ पैकी अजूनही ९० घरांमध्ये लोक रहात आहेत.
ट्रस्ट आणि रहिवाशांमध्ये वाद असल्याने इमारत पुर्नबांधणीचा प्रस्ताव रेंगाळून पडला आहे. काही लोकांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊन इमारती धोकादाक बनल्या आहेत. (प्रतिनिधी)