एफटीआयआयमध्ये उद्या गजेंद्र चौहान येणार
By Admin | Updated: January 6, 2016 01:56 IST2016-01-06T01:56:31+5:302016-01-06T01:56:31+5:30
एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप केला. त्याच चौहान यांचा गुरुवारी एफटीआयआयमध्ये दिमाखात प्रवेश होणार

एफटीआयआयमध्ये उद्या गजेंद्र चौहान येणार
पुणे : एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप केला. त्याच चौहान यांचा गुरुवारी एफटीआयआयमध्ये दिमाखात प्रवेश होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेच्या प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यांच्या निषेधार्थ रंगविण्यात आलेल्या भिंती स्वच्छ करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असून, प्रवेशद्वारावर उभी राहिलेली कलाकृतीदेखील हटविण्यात आली आहे.
चौहान यांच्या नियुक्तीसह इतर सदस्यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. मात्र चर्चेच्या गुऱ्हाळात पिसल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अखेर दोन महिन्यांपूर्वी संप मागे घेण्याची वेळ आली. तरीही चौहान यांना संस्थेत प्रवेश करू दिला जाणार नाही, अशी भूमिका देखील विद्यार्थ्यांनी जाहीर केली होती. पण विद्यार्थ्यांचा विरोध झुगारत चौहान नियामक मंडळासह उद्या संस्थेत ‘एन्ट्री’ करीत आहेत.संस्थेत गुरुवारी नियामक मंडळाची बैठक होत आहे.