गजानन पेंढरकर कालवश
By Admin | Updated: October 9, 2015 05:04 IST2015-10-09T05:04:49+5:302015-10-09T05:04:49+5:30
भारतीय आयुर्वेदाचा ठेवा जगभर पोहोचवण्यात अग्रभागी असलेल्या ‘विको लॅबोरेटरीज’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक गजानन केशव पेंढरकर यांचे परळ येथील

गजानन पेंढरकर कालवश
मुंबई : भारतीय आयुर्वेदाचा ठेवा जगभर पोहोचवण्यात अग्रभागी असलेल्या ‘विको लॅबोरेटरीज’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक गजानन केशव पेंढरकर यांचे परळ येथील घरी गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. दुपारी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार बंधू, दोन कन्या, एक मुलगा असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेंढरकर यांची प्रकृती खालावली होती. परळमधल्या अशोक टॉवरमधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. पेंढरकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परेलच्या डॉ. एस.एस. राव रोड, गांधी रुग्णालयाजवळ अशोक टॉवर, बँक्वेट हॉल येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत श्रद्धांजली सभा होणार आहे.
पेंढरकर यांनी गुजरातच्या अहमदाबादमधून औषधशास्त्राचे पदवी शिक्षण घेतले. नंतर १९५७मध्ये वडिलांच्या व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. सुरुवातीच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत परळ येथील १२० चौरस फुटांच्या जागेत विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी अर्थात ‘विको’चे काम सुरू केले. घरोघरी फिरून त्यांनी आपल्या उत्पादनांची जाहिरात केली. पुढे डोंबिवलीत त्यांनी कारखाना सुरू केला; आणि ‘विको’चा जगभर विस्तार केला.
पेंढरकर यांनी गेली ४५ वर्षे विको समूहाचे अध्यक्षपद भूषविले. या काळात त्यांनी ‘विको’च्या आयुर्वेदिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला. आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अतिशय परिश्रम घेतले. आजघडीला ४०हून अधिक देशांमध्ये ‘विको’च्या उत्पादनांना मागणी आहे. (प्रतिनिधी)
द्रष्टा उद्योजक हरपला!
‘विको लॅबोरेटरीज’चे अध्यक्ष गजानन केशव पेंढरकर यांच्या निधनामुळे अवघे उद्योगविश्व हळहळले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि दु:ख व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विश्वात पेंढरकर यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करतानाच आयुर्वेदाच्या प्रसारासाठीही मोठे योगदान दिले. विशेषत: जागतिक बाजारपेठेत विविध
आयुर्वेदिक उत्पादनांना मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक द्रष्टा उद्योजक गमाविला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व
डोंबिवलीमधील गणेश मंदिराच्या उभारणीवेळी त्यांच्याशी जवळचा संबंध आला. त्यांनी तत्काळ चेक दिला. उद्योजकतेमध्ये नावलौकिक मिळवताना अध्यात्मालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले. शिवाय उत्पादन आणि जाहिरातीमध्ये नवीन कल्पना आणण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांच्या रूपात मोठा उद्योजक गेल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
- माधव भिडे (संस्थापक-अध्यक्ष, सॅटर्डे क्लब)
मराठी फॉरवर्ड
थिंकर गमावला
जगात देशाचे नाव उंचावण्याचे काम त्यांनी केले. आयुर्वेदिक उत्पादनांना जागतिक स्तरावर त्यांच्यामुळे अधिक नावलौकिक मिळाला. नवोदित उद्योजकांना त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. त्यांचे पुत्र हा वारसा अधिक पुढे नेतील, याची खात्री आहे.
- नितीन पोतदार (संस्थापक, मॅक्सेल फाउंडेशन)
उद्योगविश्वाचे विद्यापीठ हरपले : गजानन पेंढरकर हे अवघ्या उद्योगविश्वाचे विद्यापीठ होते. कित्येक लोकांनी पेंढरकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन उद्योगाला सुरुवात केली. तसेच, पेंढरकर हे कुटुंबाचा आधार होते, त्यांनी कायम कुटुंबाला प्रोत्साहन देऊन उद्योगविश्वात सक्रिय केले. त्यांचे वक्तृत्व कौशल्य, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी होते. पेंढरकर यांचे ‘कर्म चाले संगती’ हे आत्मचरित्र नव्या पिढीतील प्रत्येक उद्योजकाने वाचले पाहिजे.- मीनल मोहाडीकर
संघर्षशील उद्योगपतीला देश मुकला
ज्येष्ठ उद्योगपती गजाननराव पेंढरकर यांच्या निधनाने देश एका अत्यंत मेहनती, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या आणि तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या उद्योगपतीला मुकला आहे. पेंढरकर आणि माझा ऋणानुबंध
३० वर्षांपासून होता. मुंबईत माझी त्यांची नेहमी भेट व्हायची. फारसे कुणाचे पाठबळ नसताना ते नेहमी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करायचे. ही गोष्ट मला नेहमी अभिमानास्पद वाटत आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी ‘विको’ला समोर आणले. गजाननराव पेंढरकरांना माझी विनम्र श्रद्धांजली.
- खासदार विजय दर्डा,
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत वृत्तपत्र समूह
उत्साही व्यक्तिमत्त्व
गजानन पेंढरकर यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता. त्यांना साहित्य-कलाक्षेत्रातही रुची होती. माझे आणि पेंढरकर यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. प्रत्येक भेटीत कोणत्याही विषयावर चर्चा केल्यास अगदी सहज ते निष्कर्षापर्यंत येत असत, त्यात त्यांची विशेष हातोटी होती.
- जयराज साळगावकर, कालनिर्णय
समाजाभिमुख
उद्योजक गमावला
गजानन पेंढरकर यांनी आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवर ‘विको’ हा ब्रँड त्या काळात प्रस्थापित केला. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना कायम त्यांनी जपली आणि शेवटच्या क्षणापर्यंत समाजाला परतफेड करत राहिले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने समाजाभिमुख होते.
- किशोर रांगणेकर, सारस्वत
बँकेचे माजी उपाध्यक्ष
उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले
गजानन पेंढरकर हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. मराठी लोकांनी उद्योग क्षेत्रात यावे, यासाठी कायम प्रोत्साहित करायचे. त्यांच्याकडे उत्तम बुद्धिमत्ता, चातुर्य आणि संवाद कौशल्य होते. मराठीत अशा प्रकारे प्रसिद्धी, यश मिळवूनही समाजाचा विचार करणारा उद्योजक पुन्हा होणे नाही.
- अनंत भालेकर, चेअरमन, मराठी व्यावसायिक उद्योजक
व्यापारी मित्रमंडळ
मराठी उद्योगविश्वाचे प्रेरणास्थान
गजानन पेंढरकर हे मराठी उद्योगविश्वाचे प्रेरणास्थान आहेत. ते सर्वांनाच गुरुस्थानी होते. पितांबरी उद्योगसमूहाच्या निर्मितीची प्रेरणा त्यांच्याकडून घेतली. त्यांच्या जाण्याने मराठी उद्योगविश्वाचे नुकसान झाले आहे.
- रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी