मारहाणीच्या घटनेला गायकवाडच जबाबदार
By Admin | Updated: April 19, 2017 02:58 IST2017-04-19T02:58:24+5:302017-04-19T02:58:24+5:30
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या इशा-यावरुन त्यांच्या सुरक्षारक्षकांनी अगोदर

मारहाणीच्या घटनेला गायकवाडच जबाबदार
मुंबई : राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या इशा-यावरुन त्यांच्या सुरक्षारक्षकांनी अगोदर आमच्या कार्यकर्त्यांवर हात उचलला आणि त्यातून मारहाणीची घटना घडली, असा दावा भारिप बहुजन महासंघाचे सरचिटणिस ज. वि. पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
औरंगाबादमध्ये सुभेदारी, या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात गायकवाड यांना सोमवारी मारहाण झाली. याप्रकरणी भारिपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली. या घटनेबाबत पवार यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही हिंसेचे समर्थन करणार नाही. आमचे कार्यकर्ते चुकीच्या पद्धतीने वागले असतील, तर आम्ही त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करू. पण या घटनेमागची वस्तुस्थिती वेगळी आहे. आमचे कार्यकर्ते सुभेदारीवर एका बैठकीसाठी जमले असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यातून बाचाबाची झाली. सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांवर हात उचलला, असा दावा पवार यांनी केला. कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गायकवाड आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांविरूद्ध तक्रार केली आहे, असेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सहा जणांना पोलीस कोठडी
औरंगाबाद : राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह ६ जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहंमद यांनी २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली. दोन महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
सोमवारी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याच्या कारणावरून रत्नाकर गायकवाड यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती. पोलिसांनी अमित भुईगळ (३८), दिनेश सांडूजी साळवे (३९), गौतम नामदेव गवळी (४७), संदीप जिजा वाघमारे (२८), श्रीरंग पांडुरंग ससाणे (५१) आणि प्रदीप छगन इंगळे (२५) यांच्यासह दोन महिला अशा ८ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)