युवतीची छेडछाड करणारा गजाआड
By Admin | Updated: November 28, 2015 02:01 IST2015-11-28T02:01:45+5:302015-11-28T02:01:45+5:30
सानपाडा स्थानकात गुरुवारी रात्री एका तरुणीशी लगट करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला ‘लोकमत’चे कर्मचारी सचिन खामकर यांनी प्रसंगावधान दाखवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

युवतीची छेडछाड करणारा गजाआड
नवी मुंबई : सानपाडा स्थानकात गुरुवारी रात्री एका तरुणीशी लगट करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला ‘लोकमत’चे कर्मचारी सचिन खामकर यांनी प्रसंगावधान दाखवून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सचिन हे गुरुवारी कार्यालयीन काम आटोपून घरी जाण्यासाठी साडेअकराच्या सुमारास सानपाडा स्थानकात गेले. सीएसटीहून पनवेलला जाणारी १२.0४ची लोकल रेल्वे स्थानकात आल्यावर लोकलमध्ये लिंबू व तत्सम वस्तूंची विक्री करणारी एक तरुणी महिला डब्यासमोर येऊन थांबली.
त्या वेळी एक मद्यधुंद तरुण तिच्या मागोमाग आला आणि तिच्याशी लगट करू लागला. त्यामुळे ती तरुणी घाबरली. काही अंतरावर उभे असलेल्या सचिन यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने त्या तरुणाकडे आपला मोर्चा वळविला. त्याला पकडून महिला डब्यात तैनात असलेले पोलीस हवालदार व्ही. एस. शिंदे यांच्या हवाली केले.
दरम्यान, झाला प्रकार लक्षात येताच डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलाही एकवटल्या. त्यांनी त्या तरुणाला चोप देत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी
केली.
या प्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव शैलेश चव्हाण (२८) असे असून, तो मानखुर्द येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)