गडकरींना ‘लक्ष्मीदर्शन’ भोवणार
By Admin | Updated: October 7, 2014 05:37 IST2014-10-07T05:29:11+5:302014-10-07T05:37:26+5:30
येत्या १० दिवसांत (म्हणजे १५ आॅक्टोबरच्या मतदानापर्यंत) तुमच्या नशिबी ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका

गडकरींना ‘लक्ष्मीदर्शन’ भोवणार
नवी दिल्ली : येत्या १० दिवसांत (म्हणजे १५ आॅक्टोबरच्या मतदानापर्यंत) तुमच्या नशिबी ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका, असे सांगून केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन गडकरी यांनी मतदरांना पैसे घेऊन मतदान करण्यास उद्युक्त करण्याचा गुन्हा केला आहे, असा सकृद्दर्शनी निष्कर्ष काढत निवडणूक आयोगाने गडकरी यांना सोमवारी नोटीस काढली आहे.
तुम्ही प्रचारसभेत केलेली अशा प्रकारची विधाने हा भारतीय दंड विधानाच्या कलम १७१ बी व १७१ ई अन्वये लाच देण्यास प्रोत्साहन देण्याचा गुन्हा आहे व तसे करून तुम्ही आदर्श निवडणूक आचारसंहितेचाही भंग केला आहे, असे आमचे प्रथमदर्शनी मत आहे, असे आयोगाने गडकरी यांना पाठविलेल्या नोटिशीत नमूद केले आहे.
याप्रकरणी आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी यासाठी आयोगाने गडकरी यांना बुधवार ८ आॅक्टोबरच्या सा. ५ वाजेपर्यंतची मुदत दिली असून तोपर्यंत त्यांनी उत्तर न दिल्यास आयोग, पुन्हा तुम्हाला न विचारता निर्णय घेण्यास मोकळा असेल, असा इशाराही या नोटिशीत दिला गेला आहे.
रविवारी ५ आॅक्टोबर रोजी निलंगा येथील प्रचारसभेत गडकरी यांनी केलेली जी आक्षेपार्ह विधाने, मूळ मराठीचे इंग्रजी भाषांतर करून, आयोगाने नोटिशीत उद््धृत केली आहेत ती अशी: आता मी तुमचे चेहरे पाहतो आहे व चेहऱ्यावरून भविष्य वर्तविण्याची कला मलाही थोडीफार अवगत आहे. येत्या १० दिवसात तुम्हाला ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. खास लोकांना विदेशी बॅ्रण्डची मिळेल,तर सामान्यांना देशी ब्रॅण्डची मिळेल. काय बरोबर आहेना? म्हातारीला लुगडं तर तरुणांना शर्ट-पॅन्ट देतील. आणि सर्व ‘गांधीवादी’ पाच हजार मागताहेत. या महागाईच्या दिवसांत एक गोष्ट लक्षात ठेवा, जे प्यायचे ते पिऊन घ्या, खायचे ते खाऊन घ्या. मिळेल ते ठेवून घ्या. हरामाचा पैसा गरिबाकडे जाण्याची हिच वेळ आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नका. पण मतदान करताना विचार करा. तुमचे मत महाराष्ट्राच्या विकासासाठी असायला हवे. लातूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी गडकरी यांच्या या आक्षेपार्ह विधानांची माहिती ई-मेलने कळविल्यानंतर व सोबत त्या भाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही पाठविल्यानंतर आयोगाने ही कारवाई केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)