फडणवीसांच्या मार्गात गडकरी!

By Admin | Updated: December 20, 2014 03:25 IST2014-12-20T03:25:41+5:302014-12-20T03:25:41+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे राजकीय सख्य सर्वश्रुत आहे.

Gadkari in the road to Fadnavis! | फडणवीसांच्या मार्गात गडकरी!

फडणवीसांच्या मार्गात गडकरी!

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. दोघेही रेशीम बागेच्या तालमीत तयार झाल्याने एकमेकांचे डावपेच ते चांगलेच ओळखून आहेत. मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची निवड झाल्यापासून तर दोघांमधील ‘वैचारिक’ दरी अधिकच रुंदावताना दिसत आहे. शुक्रवारी विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नावर बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘राज्याचा विकास यापुढे विदर्भकेंद्रित असेल’ असे सांगितले, तर त्याच वेळी विधान भवनच्या प्रांगणात आलेल्या गडकरींनी मात्र राज्याच्या समतोल विकासाचा राग आळवला!
देवेंद्रला मीच मोठे केले - खडसे
देवेंद्र फडणवीस यांना मीच सक्रिय केले. विदेशात भाषणांची संधी दिली. देवेंद्रला मीच मोठे केले, असे सांगत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नवा वाद छेडला.

> यापुढे विदर्भकेंद्रित विकास - मुख्यमंत्री

विधानसभेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची यापुढील दिशा ही विदर्भकेंद्रित असेल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, मराठी माणसांचे एकच राज्य केले नाही तर मुंबई गुजरातकडे जाईल, या भीतीने विदर्भाला सोबत घेण्यात आले आणि त्याला विदर्भाने ओ दिला. मात्र त्या वेळी समतोल विकासाचा विदर्भाला दिलेला शब्द नंतर पाळण्यात आला नाही. विदर्भात अन्यायाची भावना अन्याय झाला म्हणून आहे, राजकारणापोटी नाही.
राज्यपालांनी घटनेच्या कलम ३७१(२) नुसार निधीच्या समन्यायी वाटपाचे दिलेले निर्देश गेल्या १५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पायदळी तुडवले. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राकडे निधी कसा वळविला, याचीही आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्याचा समतोल विकास हवा - गडकरी

च्स्वतंत्र विदर्भाबाबत मी शंभरवेळा बोललो असून आपल्याला त्यासंबंधी पुन्हा बोलायचे नाही, असे सांगत संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशी केवळ वेगवेगळ््या विभागांच्या विकासापुरती मर्यादित भूमिका घेऊन चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा-सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांत पाण्याची परिस्थिती बिकट आहे.
च्राज्यासमोरील समस्यांचे संधीत रूपांतर करून भांडवली गुंतवणूक वाढवणे आणि रोजगारनिर्मिती करणे याला प्राधान्य दिले पाहिजे. पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. प्रदूषणविरहित इंधनावर चालणारी पहिली बससेवा नागपूरमध्ये सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Gadkari in the road to Fadnavis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.