गडकरींच्या प्रमाणपत्राची कऱ्हाडला गरज नाही

By Admin | Updated: October 7, 2014 23:48 IST2014-10-07T22:34:05+5:302014-10-07T23:48:37+5:30

पृथ्वीराज चव्हाण : मुक्ताफळे उधळणाऱ्यांचा घेतला खरफूस समाचार

Gadkari certificate does not require Karhad | गडकरींच्या प्रमाणपत्राची कऱ्हाडला गरज नाही

गडकरींच्या प्रमाणपत्राची कऱ्हाडला गरज नाही

कऱ्हाड : ‘भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपच्या गडावरून नितीन गडकरींना पायउतार व्हावे लागले, हे मला माहीत होते; पण माझ्यावर ते बिनबुडाचे आरोप करीत सुटलेत, त्यामुळे त्यांची बुद्धीही भ्रष्ट झालीय, याची खात्री वाटते. एवढा खोटारडा माणूस आयुष्यात बघितलेला नाही,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नितीन गडकरींना लगावला़
कऱ्हाड येथे विठ्ठल चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते़ आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, आनंदराव पालकर, बादशहा मुल्ला, अशोकराव पाटील, बाबासाहेब पटेल, विनायक विभुते, विजय वाटेगावकर, बापू देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती़
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘नागपूरचा एक ‘गडी’ आज कऱ्हाडात आला होता, त्यानं इथं अनेक ‘मुक्ताफळे’ उधळली़ माझ्यावर बेछूट आरोप करून चार मते मिळविण्याचा प्रयत्न केला; पण माझ्या पक्षनिष्ठेची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे़ गडकरींच्या सर्टिफिकेटची कऱ्हाडकरांना गरज नाही,’ अशी खिल्ली उडवली़
‘आज महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळविले जात आहेत़ महाराष्ट्रातील जनतेच्या जीवावर निवडून आलेले गडकरींसारखे भाट गुजरातचेच गोडवे गात आहेत़ महाराष्ट्र आजही गुजरातपेक्षा पुढे आहे़ म्हणून तर गुजरातची माणसं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राहतात़ तुलनेत महाराष्ट्रीयन माणूस गुजरातमध्ये कमी आहे़ ’
उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव म्हणाले, ‘राष्ट्रवादीने विश्वासघात केल्याने मी स्वगृही परतलोय, पृथ्वीराज चव्हाण हा कऱ्हाडचा स्वाभिमान आहे़’
यावेळी नगरसेविका स्मिता हुलवान, फारुक पटवेकर, आनंदा लादे आदींची भाषणे झाली़ यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, पुन्हा १९६० साली महाराष्ट्र-गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये झाली़ त्याच गुजरातचे नेते आता महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव करीत आहेत़ भाजपचा हा डाव सुुज्ञ जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही़ कऱ्हाडातील यशवंत विचारांचे पाईक त्यात सर्वात पुढे राहतील,’ असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला़
आजही चर्चेला तयार
गुजरात मॉडेलची टिमकी वाजविणाऱ्या मोदींना लोकसभा निवडणुकीपासून मी कोणते राज्य पुढे, या मुद्द्यावर समोरासमोर चर्चेला तयार असल्याचे सांगितले़ प्रत्येक मुद्द्यावर मी आजही बोलायला तयार आहे़ पण, मोदी अन् भाजप ग्लोबल नीतीचा वापर करीत आहेत़

Web Title: Gadkari certificate does not require Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.