भावी पत्नीची दिली ‘सुपारी’
By Admin | Updated: February 19, 2015 01:25 IST2015-02-19T01:25:14+5:302015-02-19T01:25:14+5:30
भावी पत्नीवर हल्ला करून अपंग करण्यासाठी एकाने गुंडांना दोन लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

भावी पत्नीची दिली ‘सुपारी’
पिंपरी : दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याने लग्न मोडण्यासाठी प्राध्यापिका असलेल्या भावी पत्नीवर हल्ला करून अपंग करण्यासाठी एकाने गुंडांना दोन लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुंडांनी त्याच्या भावी पत्नीस जबर मारहाणही केली.
या प्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित संतोष अग्रवाल (वय २७, रा. तळेगाव दाभाडे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार रोहित मोहनसिंग कपाडिया (३०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), अनिल बाळू कानडे (३५, रा. सुस रोड, पाषाण) व चाँद गफुर शेख (२१, फुलेनगर, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, रजनीश देविसिंग कपाडिया (२५, फुलेनगर, भोसरी) हा फरारी आहे.
येरवडा परिसरात किराणा मालाचे एक व्यापारी आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न तळेगाव दाभाडे येथील रोहितशी ठरले होते. ते दोघेही पदवीधर असून, ही तरुणी येरवडा येथील एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. त्या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न होणार होते. परंतु रोहितने मुलगी पसंत नसल्याचे घरी सांगितले. तरी रोहितच्या कुटुंबीयांनी त्याच मुलीसोबत लग्न होईल, असे ठणकावले होते. त्यामुळे रोहितने या मुलीस अपंग करण्याच्या उद्देशाने तिला इ स्क्वेअर येथे नेले.
सिनेमा पाहिल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर दोघेजण तरुणीच्या दुचाकीवर रेंजहिल्समार्गे जात होते. रोहितने लघुशंकेच्या बहाण्याने रेल्वे क्रॉसिंगजवळ दुचाकी थांबवली. त्यावेळी गुंडांनी रोहितला किरकोळ मारहाण केली. त्यानंतर तरुणीस हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. तिला गंभीर जखमी अवस्थेत जहॉंगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्या तरुणीचा नवऱ्या मुलावरच संशय बळावला.
तरुणीने वडिलांसह खडकी पोलिस ठाणे गाठले. परंतु
खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल
करून घेण्यास टाळाटाळ केली. तरुणीच्या वडिलांनी थेट पोलिस आयुक्त सतीश माथूर यांची भेट घेतली. माथूर यांनी याबाबत
तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, परिमंडळ चारचे उपायुक्त मनोज पाटील यांनीही खडकी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)
तरुणीला अपंग केल्यास तिच्यासोबत लग्न होणार नाही, या उद्देशाने गुंडांना मारहाण करण्याची सुपारी दिली होती. इतकेच नव्हे, तर तरुणीस मारहाण झाल्याची फिर्याद आरोपीनेच खडकी पोलीस ठाण्यात दिली होती.
- मनोज पाटील, पोलीस उपायुक्त