भावी सैनिकांच्या स्वप्नांना जमिनीचं अंथरूण अन् आकाशाचं पांघरूण!
By Admin | Updated: February 10, 2015 00:03 IST2015-02-09T22:36:23+5:302015-02-10T00:03:59+5:30
हे उमेदवार गेल्या दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत दाखल झाले असून, त्यातील अनेकांना तर येथे विकतचे जेवणच काय, पण वडापावही न मिळाल्याने उपाशीपोटी राहावे लागले.

भावी सैनिकांच्या स्वप्नांना जमिनीचं अंथरूण अन् आकाशाचं पांघरूण!
रत्नागिरी : रत्नागिरीत ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागांसाठीच्या सैन्यदल भरतीबाबत नियोजनात अनेक त्रुटी असल्याने सैन्यात भरती होण्यास आलेल्या हजारो उमेदवारांना राहण्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे मारुती मंदिर परिसरातील रस्ते, क्रीडांगणाच्या भोवतीचा परिसर व व्यावसायिक संकुलांच्या आवारात वास्तव्य करण्याची वेळ शेकडो उमेदवारांवर आली आहे.८ फेब्रुवारी २०१५ रोजी सैन्य भरतीला सुरुवात झाली असून, प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी शिवाजी स्टेडियममध्ये भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी आज सोलापूर येथील सात हजारांवर उमेदवारांनी भरती प्रक्रियेत हजेरी लावली. हे उमेदवार गेल्या दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत दाखल झाले असून, त्यातील अनेकांना तर येथे विकतचे जेवणच काय, पण वडापावही न मिळाल्याने उपाशीपोटी राहावे लागले. अनेक उपाहारगृहातील खाद्यपदार्थ संपल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मारुती मंदिर परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. परंतु सैन्यभरतीसाठी एवढ्या प्रमाणात उमेदवार येणार असल्याची साधी कल्पनाही त्यांना नाही. त्यामुळे हॉटेल्समधील खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रमाण नेहमीप्रमाणेच राहिल्याने या शेकडो उमेदवारांना जेवण, नाश्ताही मिळाला नाही. पाण्याचेही हाल झाले.
भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शिवाजी स्टेडियमच्या मागील भागात असलेल्या बहुउद्देशीय संकुलातील व्यावसायिक गाळे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अन्य काही ठिकाणीही त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ही निवास व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेकडो उमेदवारांना मारुती मंदिर सर्कलमध्ये उघड्या आभाळाखाली पांघरूण घेऊन झोपावे लागले.त्यामुळे भरतीसाठी आलेल्या हजारो उमेदवारांचे हाल झाले. (प्रतिनिधी)
उमेदवार संख्या लाखावर जाणार!
१० फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्ह्यातीलच उमेदवार सैन्य भरतीसाठी येणार आहेत. त्यामुळे यादिवशी उमेदवारांची फारशी गैरसोय होण्याची शक्यता नाही. फेब्रुवारी ११ रोजी कोल्हापूर, १३ला सांगली, १४ला गोवा, १५ला सातारा, १६, १७ला उर्वरित महाराष्ट्र, गुजरात व गोव्याच्या उमेदवारांची भरती होणार आहे. या ठिकाणांहून प्रत्येक दिवशी सुमारे १० हजारांच्यावर उमेदवार सैन्य भरतीसाठी रत्नागिरीत येण्याचा अंदाज जिल्हा सैनिक कल्याण विभागाने व्यक्त केला आहे. भरतीकाळात येणाऱ्या उमेदवारांची ही संख्या लाख ते दीड लाखांवर जाण्याची शक्यता लक्षात घेता या तरुणांची निवास व्यवस्था कशी काय होणार, याचे नियोजन अजूनही करण्यास वाव आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार येऊनही त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली नाही तर उद्यानात वास्तव्य करणे व प्रात:विधी उरकणे असे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैनिक कल्याण विभागाने सतर्क राहाणे गरजेचे आहे.