भावी नगरसेवक उतावीळ

By Admin | Updated: July 4, 2016 01:59 IST2016-07-04T01:59:38+5:302016-07-04T01:59:38+5:30

विधानसभा निवडणुकीवेळी काही नगरसेवकांनी लक्ष्य विधानसभा, तसेच भावी आमदार, अशी जाहिरातबाजी केली होती.

Future corporators are awful | भावी नगरसेवक उतावीळ

भावी नगरसेवक उतावीळ


पिंपरी : विधानसभा निवडणुकीवेळी काही नगरसेवकांनी लक्ष्य विधानसभा, तसेच भावी आमदार, अशी जाहिरातबाजी केली होती. त्याचे अनुकरण आता भावी नगरसेवक अशा पद्धतीने होऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी असे करणाऱ्यांची संख्या मोजकीच
होती. महापालिका निवडणूक
जवळ येऊ लागताच भावी नगरसेवक म्हणून मिरविणारे शहरात गल्लोगल्ली दिसून येत आहेत.
लक्ष्य २०१७ असा उल्लेख करून, महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत दाखवून, जवळ आपली छबी उमटविलेले जाहिरातफलक शहरात ठिकठिकाणी दिसून येतात. सण, उत्सवाचे औचित्य साधून नागरिकांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने स्वत:ची जाहिरातबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांसाठी लावण्यात येणाऱ्या जाहिरातफलकांवर जणू काही नगरसेवक झाल्याच्या आविर्भावातील त्यांची छबी पाहावयास मिळते. काहींनी तर स्वत:च्या आणि मित्रमंडळींच्या वाहनांच्या काचेवर भावी नगरसेवक असाच उल्लेख केला आहे. महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे सूचक संकेत त्यातून मिळू लागले आहेत. कधी पतसंस्थेची अथवा गृहसंस्थेची निवडणूक न लढलेल्यांनाही नगरसेवक झाल्याची स्वप्नं पडू लागली आहेत.
या वेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची निवडणूक होणार आहे. चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असेल. त्यामध्ये चार उमेदवार एकत्रित निवडणूक लढणार आहेत. सुमारे ५० हजारांच्या मतदार संख्येचा प्रभाग असेल. मिनी विधानसभा मतदार संघ अशा स्वरूपातील पूर्वीपेक्षा आकाराने वॉर्ड मोठा असल्याने निवडणूक लढणे पहिल्यापेक्षा अवघड झाले आहे. अशा स्थितीत विद्यमान नगरसेवक, तसेच एकापेक्षा अधिक टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेले धास्तावले आहेत. बदललेली राजकीय परिस्थिती, वॉर्ड फेररचना, सोशल मीडियाचा निवडणुकीत होणारा वापर यामुळे निवडणुकीत काहीही होऊ शकते, अशी भीती अनेक विद्यमान नगरसेवक मनात बाळगून आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक कार्याने वॉर्डात ओळख निर्माण केलेल्यांना मात्र आपण नगरसेवक झालोच आहोत, असे वाटू लागले आहे. (प्रतिनिधी)
>निवडणुकीत केवळ निवड जाहीर होणेच बाकी आहे, असा त्यांनी समज करून घेतला आहे. त्यामुळे वाहनांच्या काचेवर ‘भावी नगरसेवक ’ लिहून ते त्यांचा असा उतावीळपणा ते दाखवू लागले आहेत. निवडणुकीला सात महिन्यांचा अवधी उरला असताना ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. नगरसेवक होण्यासाठी ते उतावीळ झाले असले, तरी सात महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची योग्यता लक्षात येण्यासाठी एक प्रकारे घोडेमैदान जवळ आहे.

Web Title: Future corporators are awful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.