अनधिकृत ‘स्कुबा’ विरोधात समुद्रात उपोषण
By Admin | Updated: December 8, 2015 00:32 IST2015-12-07T23:25:04+5:302015-12-08T00:32:30+5:30
सायंकाळी तहसीलदारांनी देवबाग येथे स्कुबा डायव्हिंग व्यवसायिकांची बैठक घेत अधिकृत परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अनधिकृत ‘स्कुबा’ विरोधात समुद्रात उपोषण
मालवण : तारकर्ली देवबाग समुद्रात अनधिकृतपणे सुरु असणाऱ्या स्कुबा डायव्हिंग व्यवसायामुळे मालवण बंदरजेटी येथील अधिकृत व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनधिकृत व्यवसायामुळे पर्यटनात बेशिस्त वाढीस लागली आहे. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडत आहे. याबाबत कारवाई न झाल्यास शासनास सहकार्य न करता समुद्र्रात पाण्याखाली उपोषण करण्याचा इशारा अधिकृत स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांनी तहसीलदार वनिता पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक व बंदर निरीक्षकांना दिला आहे.
दरम्यान, तहसीलदार पाटील यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात आले असून अनधिकृत व्यावसायिकांवर निश्चितच कारवाई केली जाईल असे सांगितले. सायंकाळी तहसीलदारांनी देवबाग येथे स्कुबा डायव्हिंग व्यवसायिकांची बैठक घेत अधिकृत परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवार ८ डिसेंबर पासून देवबाग किनारपट्टीवर बंदर निरीक्षक तलाठी, पोलिस पाटील लक्ष ठेवणार असून अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल असे सांगितले.
सिंधुदुर्ग जलक्रीडा सेवा सहकारी संस्था मालवण यांच्यावतीने अध्यक्ष रुपेश प्रभू, सचिन गोवेकर यांनी हे निवेदन तहसीलदारांना देत तत्काळ कारवाईची मागणी केली. यावेळी दामोदर तोडणकर, एजाज मुल्ला, जयदेव लोणे, स्वप्नील आचरेकर, सुधीर जोशी आदी व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अधिकृत स्कुबा डायव्हिंगवर मोठा परिणाम
एक खिडकी योजनेखाली मालवण बंदरजेटी येथे स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग, या जलक्रीडा सेवा पर्यटकांना पुरवतो. प्रवाळाचे रक्षण करून मेरीटाईम बोर्ड, युएनडीपी यांच्या सूचनेनुसार बोट नांगरण्याची (अँकरिंग पॉर्इंट ) जागा करण्यात आली आहे. मात्र, तारकर्ली देवबाग येथे अनधिकृतपणे स्कुबा डायव्हिंग सुरु आहे. याचा परिणाम व्यवसायावर झाल्याचे सांगत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आजपासून अनधिकृत ‘स्कुबा’ बंद
तहसीलदार पाटील यांनी सहाय्यक बंदर अधिकारी श्रेया कांबळी यांच्यासमवेत देवबाग येथे जात व्यावसायिकांची बैठक घेऊन अनधिकृत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले. अनधिकृत व्यवसाय सुरु राहिल्यास कारवाईचा बडगा व्यावसायिकांवर उगारला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.