भरधाव टिप्परने मुलाला चिरडले
By Admin | Updated: July 17, 2014 01:12 IST2014-07-17T01:00:11+5:302014-07-17T01:12:22+5:30
रिसोड येथील घटना : टिप्परचालक घटनास्थळावरून पसार.

भरधाव टिप्परने मुलाला चिरडले
रिसोड : भरधाव टिप्परने ११ वर्षीय शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना स्थानिक शिक्षक कॉलनीनजिक १६ जुलैच्या सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, येथील तुषार गजानन भालेराव हा विद्यार्थी येथील सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये वर्ग पाचवीत शिकत होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तुषार शाळेत जाण्यासाठी घरून निघाला. दरम्यान, शिक्षक कॉलनीजवळ एका टिप्परने त्याला समोरून धडक दिली. यामध्ये तुषारचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तुषार हा गजानन भालेराव यांचा एकुलता एक मुलगा होता.
या घटनेमुळे काही नागरिक घटनास्थळावर जमले. परिणामी, काही काळासाठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला; परंतु तोवर टिप्परचा चालक पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास प्रभारी ठाणेदार गवई करीत आहेत.