शरद जोशी यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार
By Admin | Updated: December 14, 2015 00:09 IST2015-12-14T00:09:19+5:302015-12-14T00:09:19+5:30
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शरद जोशी यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार
पुणे : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डेक्कन येथील नदीपात्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर तिथून वैकुंठ स्मशानभुमीपर्यंत अंत्ययात्रा निघेल.
शरद जोशी यांचे शनिवारी पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्यांचे पार्थिव पुना हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आले आहे. कॅनडा येथील श्रेया शहाणे व अमेरिकेतील डॉ. गौरी जोशी या त्यांच्या मुली सोमवारी रात्री पुण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी शरद जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी सांगितले.
डेक्कन येथील नदीपात्रात अंत्यदर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. दुपारी नदीपात्रातून अंत्ययात्रा निघेल. वैकुंठ स्मशानभुमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. जोशी यांच्या ‘अंगारमळ्या’त अंत्यसंस्कार करावेत, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र ज्या ठिकाणी आईचा अंत्यविधी झाला त्याच ठिकाणी माझा अंत्यविधी व्हावा, अशी इच्छा जोशी यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे जोशी यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जातील, असे सांगण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट यांनी शरद जोशी यांच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणास भेट दिली. तसेच प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. सरोज काशीकर यांच्याशीही फोनवरून चर्चा केली.