सासरच्या दारातच केले विवाहितेवर अंत्यसंस्कार!
By Admin | Updated: May 15, 2015 01:26 IST2015-05-15T01:26:36+5:302015-05-15T01:26:36+5:30
लग्नाला वर्षही उलटले नाही तोच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना वांबोरीत गुरुवारी घडली

सासरच्या दारातच केले विवाहितेवर अंत्यसंस्कार!
राहुरी (जि. अहमदनगर) : लग्नाला वर्षही उलटले नाही तोच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना वांबोरीत गुरुवारी घडली. यामुळे संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळीनी सासरच्या घराची मोडतोड करून घरासमोरच अंत्यसंस्कार केले. या प्रकाराने वांबोरीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच विवाहितेच्या पतीसह नातेवाइकांना अटक करण्यात आली आहे.
पागिरे-पठारे वस्तीवरील माधुरी नितीन पागिरे (२०) हिचा विवाह जुलै २०१४ रोजी नितीन याच्याबरोबर झाला होता़ विवाहानंतर काही दिवसांतच माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत पती, सासू-सासऱ्यांकडून माधुरीचा छळ सुरू झाला. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी माधुरी माहेरला निघून गेली. शेवटी काहींच्या मध्यस्थीनंतर आठ दिवसांपूर्वी ती नांदण्यास सासरी आली होती़
माधुरीचे घरातील लोकांशी रविवारी पुन्हा भांडण झाले़ त्यातूनच तिने विषारी औषध प्राशन केले़ तिला अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र गुरुवारी तिचा मृत्यू झाला. हे वृत्त माधुरीच्या माहेरी समजताच संतप्त नातेवाईक तडक माधुरीच्या सासरी येऊन धडकले.
मात्र पोलिसांनी त्यापूर्वीच नितीनसह त्याच्या कुटुंबीयांना अटक करून पोलीस ठाण्यावर आणले. त्यानंतर माहेरची मंडळी वस्तीवर पोहोचली, परंतु घरी कोणीच न सापडल्याने त्यांनी नितीनच्या घरातील वस्तूंची नासधूस केली़ तसेच माधुरीचा अंत्यसंस्कार घरातच करण्याचा आग्रह धरला़ त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने राहुरीतून आणखी पोलिसांची कुमक मागविण्यात आली़ परंतु संतप्त नातेवाइकांनी घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. (प्रतिनिधी)