सुकलेल्या फळबागांचा करणार अंत्यविधी

By Admin | Updated: May 30, 2016 02:29 IST2016-05-30T02:29:07+5:302016-05-30T02:29:07+5:30

अधिका-यांना वाटल्या कार्यक्रमाच्या पत्रिका : वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांचा पवित्रा.

Funeral horticulture | सुकलेल्या फळबागांचा करणार अंत्यविधी

सुकलेल्या फळबागांचा करणार अंत्यविधी

वाशिम: प्रशासकीय अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या दप्तर दिरंगाईमुळे शेतकर्‍यांना फळबाग व पीक विमासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय निसर्गही कोपल्यामुळे फळबाग वाळून गेली. त्यामुळे फळझाडे उखडून त्यांचा अंत्यविधी कृषी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सुशिला देवढे यांनी २९ मे रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. यासाठी निमंत्रण पत्रिका छापून अधिकार्‍यांना आमंत्रणसुद्धा दिले आहे.
मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील सुशिला सुभाषराव देवढे, शालीकराम विश्‍वनाथ लादे, भवानी भाऊराव पोफळे व योगेश बाबाराव देवढे या शेतकर्‍यांनी त्यांच्या मालकीच्या दुबळवेल येथील शेतांमध्ये गत सहा वर्षांपूर्वी संत्रा, डाळिंब व आंबा यासारख्या फळपिकांची लागवड केली. दरम्यानच्या कालावधीत अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत, उसनवारी, कर्ज काढून फळबागांचे संगोपन केले.
पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्तीमुळे झाडांचे संगोपन करणे कठीण बनलेल्या शेतकर्‍यांनी फळबाग पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनातील अधिकार्‍यांचे उंबरठे झिजविले असता, शासकीय नियमातील आडकाठीमुळे दुबळवेल गावाचा समावेश असलेले मंडळ विम्यासाठी पात्र ठरत नाही.
फळबाग पीक विमा लागू होण्यासाठी सदरहू मंडळात किमान २0 हेक्टर शेतजमिनीवर फळबाग लागवड असणे शासकीय नियमानुसार गरजेचे आहे. प्रत्यक्षात किन्हीराजा मंडळात ३९ हेक्टर एवढी फळबाग आहे, असे असतानाही आतापर्यंत सदर विभागाने फळबागेचे क्षेत्र कमी दाखविल्याचे गौडबंगाल काय, हा शेतकरी वर्गाला अचंबित करणारा प्रश्न ठरणार आहे. दरम्यान, २0१६ पासून आता यापुढे फळ पीक विमा लागू होईल, असे कृषी विभागाने संबंधित शेतकर्‍यांना कळविले आहे.
शेतकरी फळ पीक विमा योजनेसाठी पात्र असताना त्यांच्याकडून विमा भरून घेतला असता तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती. कृषी विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे हा प्रकार घडला आणि म्हणून याच्या निषेधार्थ शेतजमिनीवरील फळझाडे उखडून काढून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी मालेगाव, मंडळ अधिकारी आदींच्या उपस्थितीत झाडे जाळून त्याचा प्रतीकात्मक अंत्यविधीचा कार्यक्रम दुबळवेल येथे ३१ मे रोजी आयोजित करून कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वितरित केल्या आहेत.

Web Title: Funeral horticulture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.