माजी आमदार राजीव राजळे यांच्यावर अंत्यसंस्कार; नगर जिल्ह्यावर शोककळा; पंकजा मुंडे, राम शिंदे यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:58 IST2017-10-09T02:57:46+5:302017-10-09T02:58:05+5:30
पाथर्डीचे माजी आमदार राजीव अप्पासाहेब राजळे (४८) यांचे शनिवारी (दि.७) रात्री निधन झाले. कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत व शोकाकुल वातावरणात रविवारी

माजी आमदार राजीव राजळे यांच्यावर अंत्यसंस्कार; नगर जिल्ह्यावर शोककळा; पंकजा मुंडे, राम शिंदे यांची उपस्थिती
अहमदनगर : पाथर्डीचे माजी आमदार राजीव अप्पासाहेब राजळे (४८) यांचे शनिवारी (दि.७) रात्री निधन झाले. कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत व शोकाकुल वातावरणात रविवारी दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजळे यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली.
स्व. राजळे यांच्या मागे पत्नी आमदार मोनिका राजळे, वडील माजी आमदार अप्पासाहेब राजळे, आई मोहिनी राजळे, दोन मुले, एक बंधू असा परिवार आहे. स्व. राजळे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे, माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर (गंगापूर, जि. औरंगाबाद) यांचे जावई, तर माजी आमदार शंकरराव गडाख (नेवासा) यांचे ते मेहुणे होते.
राजळे हे काही दिवसांपासून न्युमोनियामुळे आजारी होते़ मुंबईत उपचार सुरू असताना शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी त्यांचा पार्थिव देह कासार पिंपळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला व तेथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून राजळे यांची अंत्ययात्रा टाळ-मृदंगाच्या गजरात निघाली. दुपारी चारच्या सुमारास ज्येष्ठ सुपुत्र कृष्णा व कनिष्ठ बंधू राहुल यांनी राजळे यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
या वेळी झालेल्या शोकसभेला विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारो नागरिक उपस्थित होते. राजळे यांच्या निधनाने पाथर्डी शहर व तालुक्यातील अनेक गावात बंद पाळून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.