...तर सांगली-कोल्हापूर रस्ता केंद्राच्या निधीतून
By Admin | Updated: May 30, 2015 01:02 IST2015-05-30T00:59:11+5:302015-05-30T01:02:30+5:30
नितीन गडकरी यांची ग्वाही : काँग्रेस नेत्यांची गरिबी हटली !

...तर सांगली-कोल्हापूर रस्ता केंद्राच्या निधीतून
सांगली : सांगली-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरण रखडले आहे. त्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तातडीने घ्यावा. राज्य शासनाला रस्त्याचे काम पूर्ण करणे जमत नसेल, तर केंद्राच्या निधीतून चौपदरीकरण पूर्ण करू, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगलीत दिली. पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत साऱ्यांनीच ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता; पण देशात कोठेच गरिबी हटली नाही. फक्त काँग्रेस नेते व त्यांच्या चेल्यांचीच गरिबी हटल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सांगलीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील होते.
मेळाव्यात खासदार संजय पाटील यांनी सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर भाष्य करताना गडकरी म्हणाले की, सांगली-कोल्हापूर रस्ता चंद्रकांतदादांकडे आहे. त्यांनी काय तो निर्णय घ्यावा. राज्य शासनाकडून या रस्त्याचे काम पूर्ण होत नसेल, तर मी केंद्राकडून जेवढा लागेल तेवढा निधी रस्त्यासाठी मिळवून देतो. सांगली ते नागज, नागज ते मंगळवेढा, मंगळवेढा ते सोलापूर या २८०० कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम मंजूर झाले असून, त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. गेल्या पन्नास वर्षांत जेवढे रस्ते महाराष्ट्रात झाले नाहीत, तेवढे रस्ते पाच वर्षांत बांधून देणार आहोत. त्यासाठी सव्वालाख कोटीचा निधीही मंजूर केला आहे.
देशावर साठ वर्षे राज्य करणारे आम्ही एका वर्षात काय केले, म्हणून विचारत आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी ते राहुल गांधींपर्यंत साऱ्यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता; पण काँग्रेस नेते व त्यांच्या चेल्यांचीच गरिबी हटली. जनता आजही गरिबीतच दिवस काढत आहे. काँग्रेसने देशाला भ्रष्टाचार, बेरोजगारी दिली आहे.
भय, भूक व आतंक यापासून देश मुक्त झाला पाहिजे. बेरोजगारांना रोजगार, शेतीला पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोनिया गांधींना देशातील तरुणांच्या रोजगाराची चिंता नाही. त्यांना त्यांच्या मुलाला (राहुल गांधी) कसा रोजगार मिळेल, याची चिंता असल्याचा टोलाही गडकरी यांनी लगावला. सांगली, आटपाडीसारखी लहान शहरे, गावांत उद्योग उभारले पाहिजेत, ही केंद्राची भूमिका आहे. आम्ही अंबानी, अदानीसाठी एक इंचही जमीन संपादन करणार नाही.
रेल्वे, वीज, रस्ते, सिंचनासाठी जमिनी घेऊ, असे जाहीर करूनही भूसंपादनाबाबत काँग्रेसकडून अपप्रचार सुरू आहे. महाराष्ट्रात सिंचनाचे क्षेत्र १६.८ टक्के आहे, तर कृषी विकासाचा दर मायनस आहे.
हे पाप कुणाचे? केंद्रात कृषीमंत्री कोण होते? असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)