Sanjay Shirsat News: अर्थ विभागाकडून मनमानी सुरू आहे. माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. निधी वर्ग करण्यात आला असेल, तर मला त्याबाबत माहिती नाही. मुख्यमंत्र्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालणार आहे. अशा गोष्टी करणे कायदेशीर नाही. असे करणे चुकीचे आहे. अर्थ खाते आपल्याला वाटते, तेच खरे असे वागत आहे. याला माझा विरोध आहे. सहन करायची एक मर्यादा असते. यापेक्षाही तुम्ही जास्त करत असाल, तर मला वाटते की, सरळ सर्वच निधी कट करून टाका, या शब्दांत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. या दोन्ही विभागांचे अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केल्याचे समजते. यानंतर आता संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झाले आहे?
या संदर्भात मला कल्पना आणि माहिती नाही. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर खाते बंद केले तरी चालेल. याबाबत मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेन. या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही, अर्थ खाते आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झाले आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का? हे मला पटलेले नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य सरकारने सन २०२५-२६ या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २२ हजार ६५८ कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागासाठी सहायक अनुदान म्हणून ३ हजार ९६० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील ४१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आला आहे. आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या ३ हजार ४२० कोटी रुपयांच्या सहायक अनुदानातून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला. या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे.