जागेअभावी विकासकामांचा निधी पडून
By Admin | Updated: June 23, 2014 04:20 IST2014-06-23T04:20:01+5:302014-06-23T04:20:01+5:30
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शौचालये बांधण्यासाठी सरकारकडे निधी आहे, पण जागा नाही. याउलट वारकऱ्यांकडे जागा आहे, पण शौचालयासाठी निधी नसल्याने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा

जागेअभावी विकासकामांचा निधी पडून
बाळासाहेब बोचरे, पुणे
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शौचालये बांधण्यासाठी सरकारकडे निधी आहे, पण जागा नाही. याउलट वारकऱ्यांकडे जागा आहे, पण शौचालयासाठी निधी नसल्याने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे वास्तव असून, सरकारने १०० टक्के अनुदान दिल्यास हा प्रश्न सुटेल, असा सूर वारकऱ्यांनी व्यक्त केला.
पंढरपूरमध्ये होणारी अस्वच्छता साफ करण्याची क्षमता नसेल, तर वारकऱ्यांना पंढरपूरला यायला बंदी घालावी का, असा सवाल न्यायालयाने केल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. पंढरपूरला तीर्थक्षेत्र विकासासाठी १८१ कोटी रुपये मिळाले असून, त्यापैकी नगरपालिकेला १५ कोटी मिळाले आहेत. या निधीपैकी ३८ कोटी केवळ शौचालयासाठी असून, त्यातील केवळ १६ कोटी खर्च झाले आहेत. उर्वरित निधी खर्च करण्यासाठी शौचालये बांधण्यासाठी जागाच मिळेनासी झाली आहे.
आळंदीला सुमारे २ लाखांच्या आसपास भाविक येतात. आळंदी नगरपालिकेने तीर्थक्षेत्र विकास निधीतून कायमची ४०० सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. १०० तात्पुरती शौचालये उपलब्ध केली. पण, तीही अपुरी पडत आहेत. नवीन शौचालये बांधायची कोठे, हा प्रश्न आहे.
तीर्थक्षेत्र विकासासाठी १८७ कोटींच्या निधीपैकी ३५ कोटी रुपये शौचालयांवर खर्च केले आहेत. पंढरपूरला येणाऱ्या १० लाख वारकऱ्यांपैकी २५ टक्के वारकरी सुविधा नसल्याने अंघोळीसाठी नदी व शौचालयासाठी पटांगणाचाच वापर करतात.