एफटीआयआयला काही दिवसांसाठी ’टाळे’ ?
By Admin | Updated: June 19, 2015 01:19 IST2015-06-19T01:19:35+5:302015-06-19T01:19:35+5:30
एफटीआयआयच्या (फिल्म अॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याप्रकरणी सहा दिवसांपासून सुरू असलेल्या

एफटीआयआयला काही दिवसांसाठी ’टाळे’ ?
पुणे : एफटीआयआयच्या (फिल्म अॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याप्रकरणी सहा दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अद्यापही दिशा गवसलेली नाही. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद देऊनही आंदोलन मागे घेण्याची कोणतीच सुचिन्हे दिसत नसल्यामुळे आता शासकीय पातळीवर मुस्कटदाबीचे हत्यार उपसण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी दि. ३० जूनपर्यंत आंदोलन मागे न घेतल्यास संस्थेला काही दिवस तरी टाळे ठोकले जाण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
चौहान हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना चित्रपटाविषयीचे ‘व्हिजन’ नसल्याने यापदासाठी ते लायक व्यक्ती नसल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाऊ लागल्याने मंत्रालयाला आंदोलनाची दखल घेण्यास भाग पडले. मात्र, मंत्रालयाने चर्चेसाठी कवाडे खुली करून विद्यार्थ्यांनी वर्ग पुन्हा सुरू करावेत, असे पत्रात नमूद केले. तरीही विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. आंदोलन मागे घेण्याबाबत कोणतेच भाष्य ते करीत नसल्यामुळे मंत्रालयाने आता मुस्कटदाबीचे तंत्र अवलंबिण्याचे ठरविले असल्याचे समजते. एक पाऊल पुढे टाकूनही विद्यार्थ्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यामुळे विद्यार्थ्यांना संस्थेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भूमिकेवर तटस्थ असून, यापैकी कोणीही एक पाऊल मागे घेण्यास तयार नाही. विद्यार्थ्यांनीच हे आंदोलन मागे घ्यावे, यासाठी शासनाने दि. ३० जून ही डेडलाईन ठरविली आहे. विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले नाही, तर त्यानंतर परिस्थिती निवळेपर्यंत एफटीआयआयला टाळे ठोकण्याची शक्यता आहे. यापूर्वी डॉ. मोहन आगाशे यांनी अभ्यासक्रमाचे स्ट्रक्चर बदलविण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे त्यांना हटविण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.