‘एफटीआयआय’च्या प्रश्नावर विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा!
By Admin | Updated: September 30, 2015 02:24 IST2015-09-30T02:24:43+5:302015-09-30T02:24:43+5:30
एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीची मंगळवारी मुंबईत विद्यार्थी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

‘एफटीआयआय’च्या प्रश्नावर विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा!
पुणे : एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीची मंगळवारी मुंबईत विद्यार्थी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, या बैठकीतही कोणताही तोडगा न निघाल्याने १ आॅक्टोबरला मंत्रालयाची समिती आणि विद्यार्थ्यांत पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ रंगणार आहे. गुरुवारी अंतिम मार्ग निघण्याची शक्यता आहे.
गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द करावी आणि एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेकरता पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाचा सोमवारी ११० वा दिवस होता. मंत्रालयाच्या वतीने चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. त्यानंतर पहिल्यांदा मुंबईत त्रिसदस्यीय समितीचे सदस्य व विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये काहीशी सकारात्मक चर्चा झाली. बैठकीतून अंतिम तोडगा निघेल, असे वाटले होते. मात्र झाली केवळ चर्चाच!
एफटीआयआयच्या विद्यार्थी शिष्टमंडळाने संजय गुप्ता (सहसचिव-चित्रपट), दीपक शर्मा (उपसचिव) व मुकेश शर्मा (फिल्म डिव्हिजन संचालक, मुंबई) यांच्या समितीसमोर मागण्या मांडल्या. हरीशंकर नच्चिमुथ्थु, विकास अर्स, रणजीत नायर, रीमा कौर, मालयाज अवस्थी, अजयन अडाट, शायनी जी. के. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने समितीबरोबर चर्चा केली. समितीने विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेऊन स्वत:ची मते स्पष्ट केली. आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी काय तोडगा काढता येईल, यासंदर्भातील पुढील चर्चा १ आॅक्टोबरला फिल्म डिव्हिजनमध्ये होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)