‘एफआरपी’चे तुकडे करणार नाही
By Admin | Updated: November 21, 2015 00:23 IST2015-11-20T23:40:43+5:302015-11-21T00:23:52+5:30
चंद्रकांतदादा पाटील : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

‘एफआरपी’चे तुकडे करणार नाही
सांगली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात एकरकमी ‘एफआरपी’ मिळावी, यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही, असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत स्पष्ट केले. ‘एफआरपी’बाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा नियोजन समिती सभेसाठी मंत्री पाटील सांगलीत आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत पाटील यांनी, एफआरपीसंदर्भात पुण्यात झालेली बैठक यशस्वी ठरल्याचा दावा केला. ते म्हणाले की, पुणे येथे शेतकरी संघटना व साखर कारखानदारांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. कारखानदारांना एकरकमी एफआरपी द्यावी लागेल. त्याचे तुकडे करण्याचा प्रश्नच येत नाही. कारखानदारांनी ‘एफआरपी’ची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात काही पर्यायही बैठकीत सुचविले आहेत.
गळीत हंगामापोटी कारखानदारांना ८५ टक्के कर्ज
दिले जाते.
या कर्जाची मर्यादा वाढवावी. केंद्राकडून शेतकऱ्यांना थेट ४५ रुपये अनुदान मिळणार आहे. ही रक्कम एफआरपीत समाविष्ट करावी, अशा काही सूचना केल्या आहेत. त्यावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्याच्या मंत्रिपदाबाबत ते म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात सांगलीला निश्चितच संधी मिळेल. पुढील नियोजन समितीची सभा नव्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होईल. (प्रतिनिधी)