मोर्चा अडवाच, हिसका दाखवू
By Admin | Updated: June 4, 2015 00:57 IST2015-06-04T00:53:40+5:302015-06-04T00:57:47+5:30
राष्ट्रवादीचे प्रतिआव्हान : धमकीला घाबरत नाही : ए. वाय., आर. के. पोवार

मोर्चा अडवाच, हिसका दाखवू
कोल्हापूर : ‘ज्यांच्यात ताकद असते, त्यांनीच आव्हान द्यायचे असते. पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार म्हटल्यावर कोणीतरी उठून आम्हाला तुटकं-फुटकं आव्हान देणार असेल तर एकदा होऊन जाऊ द्या. तुम्ही नुसता मोर्चा अडवाच; आम्ही राष्ट्रवादीचा काय हिसका असतो तो दाखवू,’ अशा शब्दांत प्रतिआव्हान देत बुधवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आव्हान स्वीकारले. आम्हीही पाच-पंचवीस वर्षे राजकारणात काढली आहेत; त्यामुळे अशा धमकीला घाबरत नाही, असा इशाराही पक्षाने दिला.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील, तर शहराध्यक्षपदी राजेश लाटकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पक्षाच्यावतीने बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ए. वाय. पाटील व पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आर. के. पोवार यांनी वरीलप्रमाणे इशारा देत भाजप कार्यकर्त्यांचे आव्हान स्वीकारले.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले होते. तो वायदा पूर्ण करावा म्हणून आम्ही सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर ६ जूनला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला; परंतु भाजप कार्यकर्त्यांनी तो अडविण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत मोर्चा काढणार म्हणून दादा, आमच्यावर रागावू नका. शेतकऱ्यांची भावना समजावून घ्या. शेतकऱ्यांना दिलेला वादा पूर्ण करा, एवढीच आमची मागणी आहे. जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमचा मोर्चा अडविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनाही मग त्याच भाषेत आम्हाला उत्तर द्यावे लागेल, असा इशारा ए. वाय. पाटील यांनी दिला.
मुश्रीफ, पाटील यांच्या
घरांवर मोर्चे कसे काढले?
कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सरकार सत्तेत होते त्यावेळी टोलविरोधी आंदोलनाचे मोर्चे तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या घरांवर काढले. त्यावेळी भाजपचे नेते मोर्चात सहभागी झाले होते. जर आता तुम्हाला राग येत असेल तर मुश्रीफ आणि पाटील यांच्या घरांवर काढलेले मोर्चे तुम्हाला कसे मान्य झाले? असा सवालही आर. के. यांनी केला.
त्यांची बोलती बंद झाली
खासदार झाल्यापासून एक वर्षात मी काय केले याचा पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर लेखाजोखा मांडला; परंतु आमच्या बावड्याच्या मित्रांनी लागलीच टीका केली.
‘आपल्या खासदारांनी काय केले नाही, फक्त वर्षभरात विमानातून वाऱ्या केल्या. त्यांचे विमान अजून हवेतच आहे. त्यांनी जरा खाली जमिनीवर उतरावे,’ अशा शब्दांत मित्रांनी टीका केली; पण जेव्हा संसदेतील कामाचा लेखाजोखा समोर आला आणि ‘टॉप टेन’ म्हणून माझा गौरव झाला, त्यावेळी मात्र याच मित्रांची बोलती बंद झाली. पत्रक निघण्याचेही बंद झाले, असे खासदार महाडिक म्हणाले.
महापालिका निवडणूक लढणार
आगामी महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढविण्यात येणार असून, या निवडणुकीचे नेतृत्व खासदार धनंजय महाडिक, आर. के. पोवार यांनी करावे, असे आवाहन शहराध्यक्ष लाटकर यांनी केले. या निवडणुकीसंदर्भात लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याचे लाटकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी शह२राध्यक्ष राजेश लाटकर, व्यंकाप्पा भोसले, जयकुमार शिंदे, लाला जगताप, अशोक साळोखे, किसन कल्याणकर, नितीन पाटील, सुनील महाडेश्वर, निरंजन कदम यांची भाषणे झाली.
बाबा सरकवास यांनी स्वागत केले, तर सुनील देसाई यांनी आभार मानले. बैठकीस अनेक नगरसेवक उपस्थित होते.
खासदार महाडिक विसरले
एकीकडे जिल्हाध्यक्ष व माजी शहराध्यक्ष पक्षाच्या व्यासपीठावरून भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रतिआव्हान देत असताना खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र त्यावर भाष्य करण्याचे टाळले; परंतु भाषण संपल्यावर आणि आभार प्रदर्शन झाल्यावर पुन्हा माईकचा ताबा घेत ६ जून रोजीच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.