आयुष्याचे अंधारलेले वास्तव बदलणारी मैत्री
By Admin | Updated: August 3, 2014 01:02 IST2014-08-03T01:02:10+5:302014-08-03T01:02:10+5:30
रेड लाईट भागातल्या लहान मुलांची संध्याकाळ ही अनेक जखमांनी भरलेली असते. पोटच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी कुणी नसल्याने त्यांच्यासमोरच सर्रास चालणारा वेश्याव्यवसाय स्वाभाविकपणे मुलांचे भावविश्व

आयुष्याचे अंधारलेले वास्तव बदलणारी मैत्री
रेडलाईट एरियातील चिमुकल्यांचे भविष्य बदलविणारे दाम्पत्य
सुमेध वाघमारे - नागपूर
रेड लाईट भागातल्या लहान मुलांची संध्याकाळ ही अनेक जखमांनी भरलेली असते. पोटच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी कुणी नसल्याने त्यांच्यासमोरच सर्रास चालणारा वेश्याव्यवसाय स्वाभाविकपणे मुलांचे भावविश्व त्यांच्या कोवळ्या वयातच उद्ध्वस्त करीत जातो. या दुष्टचक्रात त्यांचे भविष्य बंदिस्त होत असलेले पाहून एका संवेदनशील दाम्पत्याला रहावले नाही. या भीषण परिस्थितीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी या दाम्पत्याने ११ वर्षांपूर्वी त्यांना मित्रत्वाचा हात दिला.
आज हेच मैत्रीचे नाते कितीतरी चंदा, बानो, आशा, सानिया, नितीन, प्रकाश यांच्यासाठी मोठा आधार बनले.
ईसो डॅनियल आणि लीला ईसो या दाम्पत्याने या मुलांसाठी ‘शरणस्थान’ या चॅरिटेबल संस्थेची स्थापना केली. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे ११४ मुले-मुली आहेत.
संस्था म्हणजे आधारवडच!
मुला-मुलींच्या राहण्याचा, जेवण्याचा आणि शिक्षणाचा खर्च हे दाम्पत्य उचलते आहे. त्यांच्यामध्ये एक नवी आशा निर्माण करीत आहेत. येथील महिलांसाठी ही संस्था म्हणजे मोठा आधारवडच आहे. नागपूरच्या रेड लाईट एरियामध्ये दोन हजारांहून अधिक महिला देहविक्र ीचा व्यवसाय करतात. दहा-बाय दहाच्या कोंदट खोलीत हा व्यवसाय चालतो. प्रत्येक रात्री बळी पडणाऱ्या या मातांच्या माथ्यावरचे छप्परही त्यांच्या मालकीचे नाही. ज्या महिलांना पोटची मुले आहेत त्यांची अवस्था बिकटच. अशा मुलांना या जीवघेण्या चक्रातून बाहेर काढण्याचा पण २००२ मध्ये या दाम्पत्याने घेतला. तो आजही कायम आहे. यावेळी डॅनियल यांनी सांगितले, आम्ही मूळ केरळचे. झारखंड येथील एका स्टील प्लँटमध्ये दोघेही नोकरीवर होतो.
मोठ्या भावाच्या मदतीने एकदा नागपुरात येणे झाले. नागपूर आवडले, परंतु रेड लाईट एरियातील वास्तव पाहिल्यावर अंगावर शहारे आले. त्या महिलांना बाहेर काढणे शक्य नसले तरी त्यांच्या मुलांना चांगले जीवन देण्यासाठी प्रयत्न करण्याची पत्नीने गळ घातली. महिन्याभराची सुटी टाकली. त्यांच्याच वस्तीतील हनुमान मंदिरालगत असलेल्या दोन खोल्या भाड्याने घेतल्या. त्या खोल्यांमध्ये विशेषत: मुलींसाठी शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. आता मागे वळून पहाणे कठीण होते, म्हणून नोकरी सोडली.
येथील काही महिलांनी मुले आमच्याचकडे ठेवण्याचा आग्रह धरला. याच परिसरात डॉ. पीयूष तटकरे यांचे बंद असलेले क्लिनीक होते. १०-१२ खोल्याची ही इमारत भाड्याने घेतली. २००३ पासून मुलांच्या निवासासोबतच त्यांच्या भोजनाची आणि शिक्षणाची सोय आम्ही केली. ११४ मुला-मुलींचा सांभाळ करतो आहे.
यातील काही मुले शहरातील मोठमोठ्या शाळां महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. या मुलांना या वातावरणापासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होत असला तरी यात समाजाचे बळ मिळण्याची गरज आहे. कारण, आजही या वस्तीत लहान मुले मोठ्या प्रमाणावर आहेत. (प्रतिनिधी)