शिवसेनेशी दोस्ती... भाजपशी कुस्ती!

By Admin | Updated: January 5, 2016 22:28 IST2016-01-05T22:28:36+5:302016-01-05T22:28:36+5:30

राज्यात जानकरांचा अजेंडा : सातारा जिल्ह्यातील राजकीय समिकरणेही बदलण्याची शक्यता

Friendship with Shivsena ... wrestling BJP! | शिवसेनेशी दोस्ती... भाजपशी कुस्ती!

शिवसेनेशी दोस्ती... भाजपशी कुस्ती!

सातारा : भारतीय जनता पक्षाने पुरता भ्रमनिरास केल्याने व्यथित झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी शिवसेनेशी दोस्ती करून भाजपशी कुस्ती खेळण्याचा इशारा दिला आहे. आमदार जानकरांसारखे अस्त्र भात्यात वागविण्यासाठी शिवसेनाही उत्सुक आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस या दोन पक्षांवर निशाणा साधण्याबरोबरच राज्याच्या सत्तेत भाजपवर जरब बसविण्याचा शिवसेनेचा हेतूही यानिमित्ताने साध्य होऊ शकतो.पालकमंत्री विजय शिवतारे व आमदार महादेव जानकर यांनी पवारांच्या संस्थानाला धक्के दिले आहेत. या दोघांचाही संघर्ष एकाच पद्धतीचा होता. शिवतारेंना सेनेने बळ दिले; पण जानकरांना भाजपने ठेंगा दाखवला. आता जानकरांना सोबत घेण्याचा मुत्सद्दिपणा शिवतारेच करू शकतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.माण, खटाव, फलटण, बारामती या तालुक्यांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी ताकद आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी रासपची हीच ताकद लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीआधी आमदार महादेव जानकरांना सोबत घेतले होते. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपच्या कोट्यातून निवडणूक लढविली होती.
या निवडणुकीत जानकरांचा निसटता पराभव झाला होता. मात्र, चुरशीची झुंज देत जानकरांनी राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकवला. विधानसभा निवडणुकीत फलटण, खटाव-माणमध्ये रासपने उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आमदार जानकरांच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक काळात भाजपने सभा गाजवून अनेक उमेदवार निवडून आणले. या कामगिरीच्या जोरावर जानकरांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या हालचालीही भाजपने सुरू केल्या होत्या; परंतु नंतर या हालचालींना खो बसला. जानकरांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे घोषित केले होते. या घटनेला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही याबाबत निर्णय झालेला नाही. भाजपने आपला निवडणुकीपुरता वापर करून घेतला, असा आरोप आता आमदार जानकर करत असून, शिवसेनेसोबत जाऊन भाजपला जागोजागी नामोहरम करण्याचा निर्धार त्यांनी अहमदनगर येथील जामखेड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त केला आहे. जानकर शिवसेनेसोबत गेले तर त्यांना आमदारकीला मुकावे लागणार हे निश्चित असले, तरी शिवसेना त्यांना बळ देऊ शकते. कारण सातारा जिल्ह्यातील पक्षाची राजकीय वाताहत थांबविण्यासाठी शिवसेनेलाही जानकरांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. (प्रतिनिधी)

जानकरांना म्हणे देशाचा पंतप्रधान व्हायचंय!
भाजपला धूळ चारू : ‘लोकमत’जवळ व्यक्त केली भावना; स्वबळासाठी देशभर मोहीम
सातारा : ‘राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांचा वापर करून भारतीय जनता पक्षानं राज्यात व केंद्रात सत्ता मिळविली. भाजपनं त्यांना कॅबिनेट पदाचं केवळ गाजर दाखवलं. यामुळे उद्विग्न झालेल्या जानकरांनी संपूर्ण महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा निर्धार केला आहे. एकेकाळी भाजपला साथ देणारे आमदार जानकर आता भाजपला धूळ चारण्याची भाषा करत आहेत. ‘राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देशाचा पंतप्रधान होऊनच दाखवेन,’ असा दावा आमदार महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.
आमदार जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने देशात विविध ठिकाणी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुसंडी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम पिच असणाऱ्या गुजरातमधील महानगरपालिकांमध्ये ६ जागा या पक्षाने मिळविल्या.
बेंगलोर महानगरपालिकेत १ जागा मिळविली. अहमदनगरमधील जामखेड व तापड नगरपंचायतीतही राष्ट्रीय समाज पक्षाने पूर्ण पॅनेल उभे केले आहे. या निवडणुकांत विरोधकांना ताकद दाखवून देण्याचा निर्धार आमदार जानकर यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना आमदार जानकर म्हणाले, ‘जानकरांची काही ताकद नाही, असं म्हणणाऱ्या पुढाऱ्यांना आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. माण-खटाव, फलटणमध्ये आम्ही विधानसभा निवडणूक लढली. पण सातारा जिल्ह्यातील जनतेला पवारांचेच जास्त प्रेम आहे.
साताऱ्याचे पाणी फलटण-बारामतीला पळविले आहे. त्याच्यावर मी आवाज उठविला. साताऱ्यातल्या जनतेला अस्मिता राखण्याची हाक दिली, पण लोकांना अजूनही प्रस्थापितांनाच डोक्यावर घेऊन नाचायचे आहे, त्याला मी काय करणार? तरीही जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कार्यरत आहे. सातारा-पंढरपूर-विजापूर या महामार्गाचेही काम मार्गी लावले आहे.’
पुणे-मराठवाड्यातील जिल्ह्यांनी मला नेतेपद दिल्याने मी या जिल्ह्यांंमध्ये आमच्या पक्षाची ताकद दाखवून देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे २५ आमदार निवडून येतील,’ असा छातीठोक अंदाजही जानकरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. कुणाच्या मेहरबानीने नव्हे तर स्वबळावर देशाचा पंतप्रधान होईन.
भाजप हा एकमेव पर्याय आमच्याकडे नाही. शिवसेना, काँगे्रस असेही पर्याय आपल्याकडे उपलब्ध असून, यापैकी एका पक्षासोबत आघाडी करून भविष्यात सत्ता स्थापन करण्याचा मनसुबाही आमदार जानकर यांनी बोलून दाखविला. (प्रतिनिधी)


लोक चमत्काराला नमस्कार करतात, हे मी अनुभवलं आहे. माझ्या नावातच ‘म. जानकर’ आहे. म्हणजे ‘मजा न कर’ असे मी समजतो. त्यामुळे संघर्ष केल्याशिवाय मला काही मिळणार नाही, हे मी जाणतो. कुणाच्या मेहरबानीवर मला पद मिळवायचे नाही.
- महादेव जानकर,
आमदार


शत्रू ‘ए’... शत्रू ‘बी’
राष्ट्रवादी अन् काँगे्रस हा रासपचा ‘ए’ शत्रू आहे. तर भाजप-शिवसेना हे पक्ष रासपचे ‘बी’ शत्रू आहेत. मस्तवालांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला भविष्यात धडा शिकवू, असेही आमदार जानकर म्हणाले.


मुंडेंमुळेच भाजपसोबत होते
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या ‘मास लिडर’मुळे राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणुकांच्या काळात भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आता गोपीनाथ मुंडे हयात नसल्याने आमदार जानकरांची कोंडी होऊन बसली आहे. ही कोंडी फोडण्याचा विडाच जणू आता त्यांनी उचलला आहे.


कारण ... राजकारण...कारण ... राजकारण...

Web Title: Friendship with Shivsena ... wrestling BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.