वारंवार वीज खंडित केल्याने शेतकरी त्रस्त

By Admin | Updated: May 8, 2014 22:43 IST2014-05-08T17:52:16+5:302014-05-08T22:43:35+5:30

आठवड्यात वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.

Frequent power breaks the farmer's helplessness | वारंवार वीज खंडित केल्याने शेतकरी त्रस्त

वारंवार वीज खंडित केल्याने शेतकरी त्रस्त

भोर : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सोळा तास भारनियमन, आठ तास असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. यामुळे पिके वाळून जात आहेत. नदीत पाणी असून उचलता येत नाही. आठवड्यात वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.
वीजपुरवठा खंडित होतो. १६ तास भारनियमन याबाबत वीजवितरण कंपनीचे अधिकारी व नामदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांनी बैठक घेतली. या वेळी दिलीप बाठे, बाळासो गरूड, विश्वास ननावरे, गजानन सोनवणे, शंकर मालुसरे, उत्तम थोपटे, अशोक पांगारे, नितीन सोनवणे, कैलास येवले व शेतकरी उपस्थित होते.
तालुक्याच्या पूर्व भागातील भोंगवली, किकवी, सारोळा, इंगवली यांच्यासह अनेक गावांत दररोज १६ तास भारनियमन, शिवाय ८ तास होणारा वीजपुरवठाही वारंवार खंडित होतो. यामुळे नदीत पाणी असूनही पाणी उचलता येत नाही. पिके वाळून जात असून भारनियमनामुळे शेतकर्‍यांनापाण्याकडे बघण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही. लाखो रुपये खर्च केलेला वाया जातोय. शेतकर्‍यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?
वीजवितरण कंपनी व पाटबंधारे विभाग एकत्रितपणे जाणूनबुजून शेतकर्‍याला पाणी उचलून देत नाहीत. त्यांचा हा डाव आहे, असा आरोपही या वेळी शेतकर्‍यांनी केला. वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात गेल्यास अभियंते, कर्मचारी कार्यालयाला भेटत नाहीत. भेटल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून शेतकर्‍यांना रिकामेच परत पाठवतात. एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास तो दुरुस्त करण्यासाठी त्याला गावातील वीजबिल वसुलीची अट घालून अडवणूक केली जाते. यात १५ दिवस ट्रान्सफॉर्मर लावत नाही. परिणामी गावाला अंधारात राहावे लागते. अनेक गावांत सिंगल फेज लाईन आहे. ती लिकेज होत नाही. खांब वाकलेत. तारा लोंबकळत आहेत, याची तक्रार करूनही दखल घेत नाहीत. कंपनीचे कार्यकारी व वायरमन कामाच्या ठिकाणी राहत नाहीत. अशा अनेक तक्रारी या वेळी शेतकर्‍यांनी तीव्र शब्दांत अधिकार्‍यांसमोर मांडून राग व्यक्त केला.
वीजवितरण कंपनीचे सासवड विभागाचे मुख्य अभियंता राखाडकर व भोरचे सहायक अभियंता माने यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पूर्व भागातील १६ तासांचे भारनियमन बंद करून ८ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, इतर कामे पावसाळ्यापूर्वी करावीत, येत्या आठ दिवसांत वीजपुरवठ्यात सुधारणा झाली नाही, तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी शेतकर्‍यांनी दिला आहे.

Web Title: Frequent power breaks the farmer's helplessness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.