एफटीआयआयच्या वादात अटकेची ठिणगी
By Admin | Updated: August 20, 2015 01:25 IST2015-08-20T01:25:27+5:302015-08-20T01:25:27+5:30
सरकारी कामात अडथळा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप ठेवत फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय)च्या ३०-३५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

एफटीआयआयच्या वादात अटकेची ठिणगी
नवी दिल्ली/पुणे : सरकारी कामात अडथळा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप ठेवत फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय)च्या ३०-३५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये शिरून पाच विद्यार्थ्यांना अटक केल्याने हा वाद चिघळला आहे. पुण्यातील या घटनेचे तीव्र पडसाद दिल्लीतील राजकीय गोटात उमटले. काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सरकारविरुद्ध सोशल मीडियावरून टीकास्त्र सोडले, तर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची पाठराखण करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या वादात नव्याने उडी घेतली आहे.
अटकेनंतर एफटीआयमधील विद्यार्थी विरुद्ध व्यवस्थापन यांच्यातील वाद आणखी चिघळला असून, विद्यार्थ्यांच्या अरेरावी वर्तनामुळे पोलिसांना बोलवावे लागल्याचा दावा संचालक प्रशांत पाठराबे यांनी केला; तर पाठराबे यांनीच पोलिसांना बोलावून गोंधळ घातला, असा विद्यार्थ्यांचा आरोप आाहे. या घटनेने ६८ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला निराळे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही तीव्र नाराजी नोंदविली. मोदीजी, हे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत. गप्प करा, निलंबित करा व अटक करा, हाच मोदींच्या अच्छे दिनचा मंत्र आहे, अशा ट्विटमधून राहुल यांनी सरकारवर टीका केली. देशभरातून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाने या विषयाचा अभ्यास करण्यास एस. एम. खान, अंशू सिन्हा व सी. नागनाथन अशी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली.