भरबाजारात तंटामुक्तीच्या अध्यक्षावर गोळीबार!

By Admin | Updated: August 25, 2016 20:51 IST2016-08-25T20:51:58+5:302016-08-25T20:51:58+5:30

कऱ्हाड तालुक्यातील चाफळ येथील आठवडा बाजारात सर्वांसमोर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षावर एकाने बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

Freedom fighter soldier fired on! | भरबाजारात तंटामुक्तीच्या अध्यक्षावर गोळीबार!

भरबाजारात तंटामुक्तीच्या अध्यक्षावर गोळीबार!

आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 25 : कऱ्हाड तालुक्यातील चाफळ येथील आठवडा बाजारात सर्वांसमोर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षावर एकाने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या घटनेने बाजारतळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर बंदूक हातात घेऊन त्याचठिकाणी उभा होता. काही वेळाने घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

विकास बबन साळुंखे (वय ४२) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. ग्रामस्थांनी उपचारार्थ त्यांना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चाफळ येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास साळुंखे हे सायंकाळी बाजारतळावर आले होते.

आठवडा बाजाराचा दिवस असल्याने त्याठिकाणी मोठी गर्दी होती. त्याचवेळी पाटण तालुक्यातील जाधववाडी येथील वडाप व्यावसायिक जीप घेऊन त्याठिकाणी आला. जीपमधील बारा बोअरची बंदूक हातात घेऊन तो खाली उतरला. विकास साळुंखे त्यांच्या दुचाकीवर बसून काहीजणांशी बोलत असताना पाठीमागून आलेल्या वडाप व्यावसायिकाने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

त्यामुळे विकास साळुंखे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. ग्रामस्थांनी त्यांना उचलून तातडीने रुग्णालयात हलविले. हल्लेखोर त्याचठिकाणी बंदूक घेऊन उभा होता. काही वेळाने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चाफळ पोलिस दूरक्षेत्रात या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Freedom fighter soldier fired on!