अंध, अपंग प्रवाशांना मोफत प्रवास, दिवाळीपासून मिळणार सवलत
By Admin | Updated: September 26, 2016 19:44 IST2016-09-26T19:44:44+5:302016-09-26T19:44:44+5:30
अंध आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या प्रवाशांना यापुढे बेस्टच्या बस गाड्यांमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

अंध, अपंग प्रवाशांना मोफत प्रवास, दिवाळीपासून मिळणार सवलत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - अंध आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या प्रवाशांना यापुढे बेस्टच्या बस गाड्यांमधून मोफत प्रवास करता येणार आहे. केंद्राच्या आदेशानुसार ही योजना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुरु होणार आहे. बेस्ट आर्थिक संकटात असल्याने या योजनेसाठी महापालिका ९० लाख रुपये देणार आहे.
अंध आणि अपंग प्रवाशांना परिवहन सेवेनतून मोफत प्रवासाची सुविधा द्यावी असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासाठी स्थानिक स्वराज्या संस्थानी अनुदान देण्याची शिफारस केंद्राने केली आहे. त्यामुळे पालिकेने ९० लाख रुपयांची मदत बेस्टला देण्याचा निर्णय घेतला आहे. अंध, अपंगांसाठी राखीव तीन टक्के निधीतून ही मदत दिली जाणार आहे. मात्र ही सेवा फक्त मुंबईतील अंध आणि अपंग प्रवाशांना लागू असणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांची योजना गुंडाळली
ज्येष्ठा नागरिकांसाठी पालिकेने १० लाख रुपये निधी राखून ठेवले होते. या आधारे त्यांना मासिक पासामध्ये ५० टक्के सूट मिळणार होती. मात्र बेस्टने त्यानुसार योजना न आखल्यामुळे ही सवलत अमलात आली नाही, त्यामुळे पालिकेने आता हा निधी अंध, अपंगांच्या योजनेसाठी वळवले आहेत. बेस्टच्या ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांचे नुकसान झाले आहे.