टीएमटीमधून अंध, अपंगांना मोफत प्रवास
By Admin | Updated: September 20, 2016 03:50 IST2016-09-20T03:50:40+5:302016-09-20T03:50:40+5:30
शहरातील अंध तसेच अपंग व्यक्तींना आता ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

टीएमटीमधून अंध, अपंगांना मोफत प्रवास
ठाणे : शहरातील अंध तसेच अपंग व्यक्तींना आता ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे परिवहनच्या तिजोरीवर ३६ लाख ४० हजारांचा वार्षिक बोजा पडणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला सोमवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेकडून अनुदान घेण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.
शहराच्या विविध मार्गांवर टीएमटीच्या बसेस धावतात. यामधून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा आहे. त्यामध्ये अंध व अपंग व्यक्तींचाही समावेश आहे. काही वर्षांपूर्वी परिवहन सेवेने अशा व्यक्तींना प्रवासी भाड्यात सवलत देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार अंध, अपंग, विद्यार्थी, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक यांना सवलत देण्यात येते. या सवलतींमुळे परिवहन प्रशासनावर वर्षाला दोन कोटी रु पये इतका आर्थिक बोजा पडतो. सवलतीच्या दरानुसार अंध व अपंग व्यक्तींना प्रवासी भाड्यात ५० टक्के इतकी सवलत देण्यात येत असून या सवलतीचा लाभ केवळ २८५ नागरिक घेत आहेत. दरम्यान, या नागरिकांना प्रवास मोफत करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी काही महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेपुढे मांडला होता. त्यास सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली असून या निर्णयानुसार टीएमटीवर ३६ लाख ४० हजारांचा वार्षिक बोजा पडणार आहे.
असे असले तरी या सुविधेमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिवहन सेवेवरील आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे, असा परिवहन प्रशासनाचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
>लाभार्थी वाढणार?
टीएमटीचे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अंध व अपंग व्यक्तींच्या मोफत प्रवासामुळे टीएमटीवर पडणारा आर्थिक बोजा महापालिकेकडून अनुदान स्वरूपात घेण्याचा पर्याय सुचवला होता.