शेतक-यांसाठी मोफत एसएमएस
By Admin | Updated: May 29, 2015 02:06 IST2015-05-29T02:06:36+5:302015-05-29T02:06:36+5:30
वाशिम जिल्हा परिषदेचा उपक्रम; अमरावती विभागात पहिला प्रयोग

शेतक-यांसाठी मोफत एसएमएस
संतोष वानखडे/वाशिम : शेतकर्यांना कृषीविषयक अद्ययावत माहिती देण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मोफत एसएमएस सुविधेचा संकल्प सोडला असून, अमरावती विभागात हा प्रयोग पहिला ठरणारा आहे. शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतीविषयक अद्ययावत माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिमचे जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) अभिजित देवगीरकर यांनी मोफत एसएमएस सुविधेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. यानंतर ही सुविधा हिंदी, इंग्रजी व मराठी या तीन भाषेत, तीन प्रकारात लिखित व व्हाईस एसएमएस शेतकर्यांच्या मोबाइलवर मोफत पाठविण्याचा आराखडा तयार करण्यात आला. जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत शेतकर्यांची तालुकानिहाय अंतिम यादी तयार झाल्यानंतर एसएमएस सुविधा सुरू होणार आहे. यासंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एसएमएसद्वारे शेतकर्यांना कृषीविषयक अद्ययावत माहिती दिली जाणार असल्याचे सांगीतले. शेतकर्यांची नावे व मोबाइल क्रमांक एकत्रित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.