मिहानमध्ये दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: December 25, 2014 00:29 IST2014-12-25T00:29:24+5:302014-12-25T00:29:24+5:30
मिहानमध्ये अखंड व स्वस्त विजेचा पुरवठा आणि आता दुसरी धावपट्टी निर्मितीचा प्रश्न सुटल्याने मिहानला बुस्ट मिळणार आहे.

मिहानमध्ये दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग मोकळा
सहा वर्षांपासून प्रलंबित निर्णयावर तोडगा : कार्गोला गती मिळणार
नागपूर : मिहानमध्ये अखंड व स्वस्त विजेचा पुरवठा आणि आता दुसरी धावपट्टी निर्मितीचा प्रश्न सुटल्याने मिहानला बुस्ट मिळणार आहे.
हवाईदलाच्या ताब्यातील २७८ हेक्टर जमीन राज्य सरकारला मिहान प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय बुधवारी नवी दिल्लीत केंद्राच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
एअर कार्गोला गती मिळणार
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नागपुरातील एअर कार्गोला गती मिळेल. गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित दुसरी धावपट्टी निर्मितीचा प्रश्न स्थानिक राजकीय नेतृत्वामुळे निकाली निघाल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले. राज्य सरकार हवाईदलाला शिवणगावलगत ४०० हेक्टर जमीन देणार आहे. या निर्णयामुळे देशविदेशातील गुंतवणूकदार मिहानमध्ये उद्योग उभे करतील, शिवाय येथील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होतील, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. माहितीनुसार, हवाईदलाच्या ताब्यात असलेली २७८ हेक्टर जमीन पाच तुकड्यात विभागली असल्याने हवाईदलाला गजराज प्रकल्पाचा एकत्रित विकास करणे शक्य नव्हते. गजराज प्रकल्पाच्या विकासासाठी हवाईदलाला धावपट्टी विकास आणि विस्तारीकरणासाठी अखंड जागेची आवश्यकता होती. पण त्याचवेळी हवाईदलाची जमीन मिहान विमानतळाच्या सीमेवर येत असल्याने प्रकल्पाच्या विकासात अडथळा निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)
मिहान-गजराज प्रकल्पाला आता गती मिळेल : नितीन गडकरी
भारतीय विमान प्राधिकरण आणि भारतीय हवाई दलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी मिळाल्याने मिहानच्या मार्गातील एक मोठा अडसर दूर झाला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता मिहान प्रकल्पाला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे हवाईदलाच्या गजराज तसेच नागपूरच्या विकासाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला मिहान, असे दोन्ही प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वास जातील, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.