लोकमत न्यूज नेटवर्क, साेलापूर: पंतप्रधान आवास याेजनेतून राज्यात ३० लाख घरे तयार हाेत आहेत. या प्रत्येक घरावर साेलर लावणार आहाेत. त्यामुळे या घरांना माेफत वीज मिळेल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.
प्रधानमंत्री आवास याेजनतून दहिणटे आणि शेळगी येथे बांधण्यात आलेल्या सदनिकांचे रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरण झाले. या वेळी ते बाेलत हाेते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सर्व घरांना राज्य सरकार ५० हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. साेलापूरने गृहनिर्माण प्रकल्प निर्मितीच्या बांधणीत एक चांगला पॅटर्न तयार केला आहे. गरीब, निममध्यमवर्गीयंसाठी चांगल्या पद्धतीच्या काॅलनी कशा तयार करता येतात याची दिशा साेलापूरने दाखवली आहे. राज्यात एकही बेघर राहू नये यादृष्टीने आणखी काम हाेईल.
साेलापूर शहरात आयटी पार्क उभे करणार
पुण्याच्या आयटी पार्कमध्ये तुम्ही साेलापूरकर काेण म्हणून आवाज दिला तर अर्धे लाेक हात वर करतात. सगळे साेलापूरकरच आहेत तिथे. परंतु, आता पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी आयटी पार्कसाठी उत्तम जागा शाेधून काढावी. मी एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभे करून देताे. जे पुण्यात आहे ते आपण साेलापुरात उभे करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.