मध्य प्रदेशातील फसलेल्या गुंतवणूकदारांना हुसकावले
By Admin | Updated: July 29, 2014 02:40 IST2014-07-29T02:40:43+5:302014-07-29T02:40:43+5:30
सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यांतही आपले जाळे पसरले होते.

मध्य प्रदेशातील फसलेल्या गुंतवणूकदारांना हुसकावले
औरंगाबाद : सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यांतही आपले जाळे पसरले होते. या जाळ्यात मध्यप्रदेशच्या महाराष्ट्र सीमेलगतच्या नेपानगरातील शेकडो गुंतवणूकदार अडकल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे काही गुंतवणूकदार सोमवारी तक्रार देण्यासाठी औरंगाबादेतील आर्थिक गुन्हे शाखेत आले होते. त्यांची औरंगाबाद पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. ‘तुम्ही तुमच्या गावाकडे पैसे भरले ना, मग तिकडेच तक्रार द्या’ असे सांगत त्यांना हुसकावून लावले.
‘सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट’ या कंपनीकडून तब्बल २० लाखांची फसवणूक झालेल्या औरंगाबादेतील नंदा बळीराम पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन दिवसांपूर्वी येथील जवाहरनगर पोलीस ठाण्यात सुपर पॉवरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर लगेच पोलिसांनी या कंपनीच्या संचालक दीपक पारखे आणि दिव्या पारखे या दाम्पत्याला पुण्यात अटक केली. तेव्हापासून सुपर पॉवरविरुद्धही तक्रारी देण्यासाठी फसल्या गेलेल्या गुंतवणूकदारांची रीघ पोलीस आयुक्तालयात लागली आहे. (प्रतिनिधी)