महात्मा फुलेंच्या चौथ्या आणि पाचव्या पिढीचे सदस्य RSS मध्ये
By Admin | Updated: January 11, 2016 16:13 IST2016-01-11T13:29:16+5:302016-01-11T16:13:23+5:30
महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा फुले यांच्या चौथ्या आणि पाचव्या पिढीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून समाजसेवेचे कार्य सुरु ठेवले आहे.

महात्मा फुलेंच्या चौथ्या आणि पाचव्या पिढीचे सदस्य RSS मध्ये
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्याजवळील मारुंजी येथे झालेल्या कार्यक्रमात दीड लाख स्वयंसेवकांनी हजेरी लावली आणि सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले. परंतु विशेष म्हणजे या कार्यक्रमात बहुजन समाजाचे आद्य नेते, समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा फुले यांच्या चौथ्या आणि पाचव्या पिढीतील व्यक्ती या कार्यक्रमात स्वयंसेवक या नात्याने उपस्थित होते.
फुले कुटुंबातील चौथ्या पिढीचे नितीन फुले संघाचे स्वयंसेवक आहेत. मागच्या आठवडयात पुण्याजवळ मारुंजी येथे RSS चा भव्य शिवशक्ती संगमाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमामध्ये नितीन फुले, त्यांचा २१ वर्षाचा मुलगा रितेश आणि चुलत बंधु दत्तात्रय पितांबर फुले सहभागी झाले होते. नितीन महात्मा फुलेंचे थोरले बंधु राजाराम फुले यांचे वंशज आहेत. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, संघाशी कसा संबंध आला त्याविषयी बोलताना नितीन यांनी सांगितले कि, आमच्या घराजवळ आरएसएसची शाखा भरायची व तिचं नाव महात्मा फुले सायम् असं होतं. बालपणापासून मी त्या शाखेमध्ये जात आहे. आरएसएसने ख-या अर्थाने समरसता, बंधुता शिकवली आणि संघाच्या दैनंदिन शाखेमधून चांगली मुल्ये आपल्यामध्ये रुजल्याचे त्यांनी सांगितले.
आता त्यांचा मुलगा रितेश, आरएसएसच्या तालमीमध्ये तयार होत आहे. शिवशक्ती संगमाच्या कार्यक्रमाने रितेशमध्ये आरएसएसबद्दलची ओढ अधिक वाढली आहे. त्याने या कार्यक्रमासाठी संपूर्ण गणवेश विकत घेतला होता असे नितीन यांनी सांगितले. यापूर्वी १९८३ मध्ये पुण्यात तळजाई टेकडीवर आरएसएसचा भव्य मेळावा झाला होता. त्यावेळी मी उपस्थित राहू शकलो नव्हतो असे नितीन यांनी सांगितले. भाऊ दत्तात्रय आणि मुलगा रितेश शिवशक्ती संगमामध्ये सहभागी झाले ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.