बुलडाणा, अकोल्यात उष्माघाताने चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: May 21, 2016 03:15 IST2016-05-21T03:15:07+5:302016-05-21T03:15:07+5:30
गत तीन दिवसात उष्माघाताने बळी गेलेल्यांची संख्या नऊवर पोहचली आहे.

बुलडाणा, अकोल्यात उष्माघाताने चौघांचा मृत्यू
अकोला/बुलडाणा : पश्चिम वर्हाडात उष्णतेचा प्रकोप कायम असून अकोल्यात दोघांचा तर बुलडाण्यात दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या तीन दिवसात उष्माघाताने बळी गेलेल्यांची संख्या नऊवर पोहचली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बाभूळगाव येथे उन्हामुळे शिवहरी धाडसे या सत्तर वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. दुसरी घटना आकोट येथे घडली. राजेंद्र महादेव तेलगोटे हे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील जयपूर येथील कांद्याचे व्यापारी बशीरखान अब्दुल्लाखान पठान (वय ६५) हे नातेवाइकाचा अंत्यविधी आटोपून गुरुवारी दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. मोताळा येथील सुभाष जगन्नाथ दोडे (वय ६३) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. दोडे यांचा बांगडी विक्रीचा व्यवसाय होता. गुरुवारी बाजारातून परतल्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.