पुण्यातील चारही तरुण छत्तीसगडमध्ये सुरक्षित
By Admin | Updated: January 3, 2016 13:35 IST2016-01-03T11:42:50+5:302016-01-03T13:35:13+5:30
पुण्याहून गडचिरोली मार्गे छत्तीसगडमध्ये गेलेल्या चार तरुणांचा शोध लागला असून, ते सुरक्षित असल्याची माहिती आहे.

पुण्यातील चारही तरुण छत्तीसगडमध्ये सुरक्षित
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३ - पुण्याहून गडचिरोली मार्गे छत्तीसगडमध्ये गेलेल्या चार तरुणांचा शोध लागला असून, ते सुरक्षित असल्याची माहिती आहे. या तरुणांशी संपर्क होत नसल्याने छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बस्तर भागातून या तरुणांचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
हे चारही तरुण सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या तळावर सुरक्षित असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओदिशामधील नक्षलप्रभावित भागांमध्ये शांततेचा संदेश देण्यासाठी या तरुणांनी सायकल टूर काढली होती. २९ डिसेंबरपासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. नागपूरमार्गे गडचिरोलीतील भातपूर गावातून या तरुणांनी बस्तरमध्ये प्रवेश केला अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा हे त्यांचे शेवटचे लोकेशन होते. हे तरुण नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते किंवा नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. या तरुणांच्या अपहरणाची बातमी आल्यानंतर युध्दपातळीवर शोधमोहिम सुरु करण्यात आली होती.
बस्तर पोलिस महानिरीक्षक एस.आर.पी.कल्लुरी यांनी बस्तरमध्ये त्या तरुणांचे अपहरण झाले असेल तर, त्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.