युरो सहाचे निकष चार वर्षांआधीच
By Admin | Updated: January 8, 2016 03:40 IST2016-01-08T03:40:11+5:302016-01-08T03:40:11+5:30
वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण ही सर्वात गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी वाहननिर्मितीसाठीचे युरो सहाचे निकष चार वर्षे आधीच लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

युरो सहाचे निकष चार वर्षांआधीच
मुंबई : वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण ही सर्वात गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी वाहननिर्मितीसाठीचे युरो सहाचे निकष चार वर्षे आधीच लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
युरो सहाचे निकष २०२४ पासून लागू होतील, असा धोरणात्मक निर्णय आधीच्या यूपीए सरकारने घेतला होता. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत हे निकष २०२० पासून म्हणजे चार वर्षे आधीच लागू करण्याचे निश्चित झाले.
जावडेकर यांनी सांगितले की, प्रदूषणाची वाढती समस्या लक्षात घेऊन वाहनांच्या निर्मितीसाठी युरो पाच हे प्रदूषण विरोधी निकष लागू करण्याचा टप्पा वगळून थेट युरो सहाचे निकष इशान्येकडील राज्ये सोडून लागू केले जातील. सध्या युरो चारचे निकष आहेत. त्यामुळे २०२० पासूनच वाहन उत्पादकांना स्कूटरपासून कंटेनरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची निर्मिती करताना युरो सहाच्या निकषांची पूर्तता करावी लागेल. या निकषांची पूर्तता करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचा दर्जा सुधारण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयत तेल शुद्धिकरण कंपन्यांमध्ये ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. युरो सहामुळे वाहनांपासूनचे प्रदूषण नव्वद टक्क्यांनी कमी होऊन स्वच्छ व प्रदूषणमुक्त शहरांसाठी त्याचा फायदा होईल. सध्याच्या वाहनांना दोन प्रकारची छोटी यंत्रे बसविले तरीही प्रदूषण नियंत्रित होईल. युरो सहाचे निकष सध्याची अस्तित्वातील वाहने कशी पूर्ण करतील या बाबतही उपाययोजना करण्यात येणार आहेत. इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीवर ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने घेतला आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.